नागपूर : प्रत्येक मॅचमध्ये शेकडो कोटींची खयवाडी-लगवाडी करणारा आणि विश्वचषकाच्या संपूर्ण हंगामात कमालीचा गरम राहणारा बुकी बाजार ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र शांत होता. प्रतिस्पर्धी अतिशय हलका असल्याने बड्या बुकींनी आपापले शटर डाऊन केले. क्रिकेट सामन्याच्या माध्यमातून बुकी बाजारात 'फटकेबाजी' करण्याऐवजी घरीच थाटामाटात लक्ष्मीपूजन करून जोरदार 'फटाकेबाजी' केली.
नागपूरचे बुकी देश-विदेशात ओळखले जातात. क्रिकेटच्या विश्वचषकातील सामन्यात ही मंडळी हजारो कोटींची खयवाडी-लगवाडी करते. थेट दुबईशीच कनेक्शन असल्याने आणि केवळ नागपूर-विदर्भच नव्हे तर संपूर्ण मध्य भारताच्या क्रिकेट सट्ट्याची हजारो कोटींच्या व्यवहाराची धुरा ही मंडळी सांभाळत असल्याने बुकी बाजार संचालित करणाऱ्या 'विदेशी आकां'कडूनही त्यांना वेगळे स्थान (लाइन) मिळते. मध्यंतरी पोलिसांनी चांगला दबाव निर्माण केल्याने बहुतांश बड्या बुकींनी आपापल्या पंटर्सना मॅचच्या सट्टेबाजीसाठी गोव्याला रवाना केले. तेथे हॉटेल, फ्लॅट अथवा फार्म हाउस घेऊन या मंडळींनी क्रिकेटच्या सामन्यावरील सट्ट्याचा व्यवहार चालविला आहे. दोन-तीन सामन्यांचा अपवाद वगळता यंदाच्या सिझनमधील आतापर्यंतच्या प्रत्येक मॅचमध्ये नागपूर-विदर्भासह, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि हैदराबादमधील बुकींनी हजारो कोटी रुपयांची लगवाडी करून शेकडो कोटींचा मलिदा घशात कोंबला आहे. जवळपास प्रत्येकच बुकी यंदाच्या हंगामात आर्थिकदृष्ट्या लबालब झाल्याचे बुकी बाजाराचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर, दिवाळीत बुकी बाजारात मोठमोठे लक्ष्मी बॉम्ब फुटण्याची शक्यता होती. मात्र, ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रविवारी भारताविरुद्ध नेदरलँड्स लढायला येणार असल्याने बुकी बाजारात विश्वचषकाच्या हंगामात सर्वांत नीचांकी भाव ४-५ पैसे देण्यात आला होता. त्यामुळे बड्या बुकींनी आपले शटर डाऊन केले. त्यांनी बुकी बाजारात डाव देण्या-घेण्याऐवजी अर्थात खयवाडी-लगवाडीची फटकेबाजी करण्याऐवजी घरीच बसून थाटामाटात लक्ष्मीपूजन केले आणि जोरदार फटाकेबाजीही केली. अगदीच किरकोळ व्यवहार करणारे छोटे बुकी मात्र सक्रिय होते. त्यांनी या मॅचवरसुद्धा सट्टेबाजी केली. मात्र, ती लाख-पन्नास हजारांच्या स्वरूपाची होती. बुकी बाजाराच्या भाषेत ही सट्टेबाजी फुसक्या, लवंगी फटाक्यासारखी होती.
अनेकांचे पाकीट इकडून तिकडे
वेगवेगळा धाक दाखवत अनेक बुकींच्या देण्या-घेण्याचा व्यवहार 'रतन' सांभाळतो. वरिष्ठांची नजर चुकवून आणि अनेकांची दिशाभूल करून कमिशनसाठी त्याची नेहमी कसरत सुरू असते. लक्ष्मीपूजनाच्या एक दिवसाअगोदरच त्याने बसल्या जागी घोडे नाचवून अनेकांचे पाकीट इकडून तिकडे केल्याचे सांगितले जाते. कुणाच्या नजरेत येणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत बुकींच्या हस्तकांची गळाभेटही घेतल्याची जोरदार चर्चा सुरू होती.