लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीनंतर शहरात प्रदूषणाच्या स्तरात चिंताजनक वाढ झाली आहे. दिवाळीच्या रात्री एअर क्वाॅलिटी इन्डेक्स (एक्यूआय) १६८ होते. मात्र त्यानंतर सर्वत्र फटाक्यांची जोरदार आतषबाजी झाली, ज्यामुळे १७ नोव्हेंबर रोजी एक्यूआय १७२ पर्यंत वाढला. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, स्थिती सामान्य होण्यास आठवडाभर तरी लागेल.
प्रदूषण धाेकादायक स्तरावर
दिवाळीच्या रात्रीपर्यंत समाधानकारक स्थितीत असलेला प्रदूषणाचा स्तर धाेक्याच्या स्तरापर्यंत पाेहचला आहे. १४ नाेव्हेंबरला एक्यूआय १६८ हाेता. सामान्यपणे १०० एक्यूआयच्या आत असल्यास स्थिती समाधानकारक मानली जाते. मर्यादा १०० च्यावर गेल्यास धाेक्याची पातळी समजली जाते. १५ नाेव्हेंबरला हा स्तर १५८ राहिला. मात्र मंगळवारी त्यात १७२ पर्यंत वाढ झाली. उत्सवाचा काळ असल्याने प्रदूषण वाढले आहे.
गरमी वाढल्यास समाधानाची आशा
प्रदूषण सामान्य हाेण्यास चार ते पाच दिवस लागण्याची अपेक्षा आहे. सध्या थंडी कमी असून धुक्याची स्थिती नसल्याने प्रदूषण लवकर कमी हाेईल, अशी अपेक्षा आहे. हवा चालत असल्याने धूर व प्रदूषण हवेसाेबत नष्ट हाेईल. सिव्हिल लाईन्स, अंबाझरी, सदर आदी भागात प्रदूषण कमी हाेण्यास दोन-तीन दिवस लागतील आणि महाल, इतवारी, सीताबर्डी यासारख्या भागात त्याला चार-पाच दिवस लागतील. अचानक थंडी कमी झाली व उष्णता वाढल्याने हवा स्वच्छ हाेईल, असे मत पर्यावरण तज्ज्ञांचे आहे.
ही हवा आराेग्यासाठी अपायकारक
मंगळवारी प्रदूषणाचा स्तर १७२ वर पाेहचला. त्यामुळे शहरातील हवा सध्या आराेग्यासाठी अपायकारक आहे. लाेकसंख्येची घनता अधिक असलेल्या महाल, सीताबर्डी भागात स्वच्छ हाेण्यास चार ते पाच दिवस लागू शकतात. प्रदूषित हवेपासून बचाव करण्यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
- कौस्तुभ चटर्जी, पर्यावरण तज्ज्ञ, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन