नागपूर : निव्वळ मौजेखातर भटक्या कुत्र्यांच्या शेपटीला फटाके बांधून ते फोडणाऱ्या आणि त्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या कोराडीमधील युवकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मागील १५ दिवसांत सोशल मीडियावर पशुक्रूरतेचे दोन व्हिडिओ बरेच चर्चेत आहेत. त्यात नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यामधील अरोली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या निमखेडा गावात भटक्या श्वानांचे तोंड व पाय बांधल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या प्रकरणात देखील तक्रार देण्यात आली आहे.
या नंतरच्या दुसऱ्या प्रकरणात भटक्या श्वानाला क्रूरतेने पकडून त्याच्या शेपटीला फटाके बांधून फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन युवकांचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला आहे. मौजेपोटी भटक्या कुत्र्याला पकडून त्याच्या शेपटीला फटाके बांधून ते फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन युवकांनी स्वत:चा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला. काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरल होत दिल्ली-मुंबईमधील पशुहितार्थ कार्य करणाऱ्या वकिलांपर्यंत पोहोचला. ही माहिती पीपल्स फॉर ॲनिमलचे आशिष कोहळे व बहुउद्देशीय संस्थेचे स्वप्नील बोधाने यांना मिळताच त्यांनी माहिती काढली. हा व्हिडिओ स्मृती नगर, मॉडर्न स्कूल कोराडी रोड परिसरातील असल्याचे कळले. त्यावरून त्यांनी व्हिडिओमध्ये असणाऱ्या मुलांविषयी माहिती घेतली.
यासंदर्भात त्यांनी कोराडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून जीवन बारई नावाच्या मुलावर पशुक्रूरता निवारण अधिनियम अंतर्गत एफआयआर दाखल केली. श्वानालाही पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणल्यावर पशुचिकित्सकाकडून त्याची वैद्यकीय तपासणी केली. संबंधित कुत्रा स्वस्थ असल्याचे निदान झाले.
प्राण्यांवर अत्याचार होत असल्यास नागरिकांनी लगेच जवळील पोलीस स्टेशन अथवा पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी. प्राण्यांवर व प्राणी हितार्थ कार्य करणाऱ्या पशुप्रेमींवर अत्याचाराच्या घटना घडल्यास पोलिसांनी त्वरित गांभीर्याने दखल घेऊन पशुक्रूरता करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी.
- स्वप्नील बोधाने, पदाधिकारी, बहुउद्देशीय संस्था, नागपूर
...