नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणानंतर सर्वच शासकीय रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’ करण्याचे निर्देश स्वत: मुख्यमंत्र्यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर मेडिकलमध्ये चार कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीमधून अग्निशमन यंत्रणा (फायर सेफ्टी) लावण्याच्या कार्याला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) ९ जानेवारी रोजी पहाटे दीड वाजताच्या सुमारास वॉर्मरला आग लागून तीन बालकांचा जळून तर उर्वरित सात बालकांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला. या घटनेनंतर शासकीय रुग्णालयांमधील अग्निशमन यंत्रणेवर बोट ठेवण्यात आले होते. मेडिकलमध्येही अद्ययावत अग्निशमन यंत्रणा नसल्याने धोका होण्याची शक्यता वर्तवली जात होती. याच दरम्यान सरकारने तातडीने राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांसह आरोग्य विभागाच्या रुग्णालयांचे अग्निशमन व इलेक्ट्रिकल अंकेक्षण करण्याचे आदेश दिले होते. मेडिकलच्या बांधकाम विभागाने फायर ऑडिट करीत साधारण १८ ते २० कोटींचा खर्च दाखविला. परंतु कोरोनाचा धोका लक्षात घेता पहिल्या टप्प्यात कोविड हॉस्पिटल असलेल्या ट्रॉमा केअर सेंटर व तीन अतिदक्षता विभागात फायर सेफ्टीचे काम होणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीने चार कोटी ३८ लाख रुपयांना मंजुरी दिली. मेडिकल प्रशासनाने हा निधी बांधकाम विभागाकडे वळता करताच शुक्रवारपासून (दि.१०) याची सुरुवात होणार आहे.
-आग विझविण्यासाठी अद्ययावत यंत्रणा
आग विझविण्यासाठी पाण्याची स्वतंत्र टाकी व पाइपलाइन टाकली जाणार आहे. सोबतच ठिकठिकाणी व वॉर्डात आग विझविण्यासाठी फवारे लावले जाणार आहेत. याशिवाय, अलर्ट देणारे अलार्म व सूचना देणारी यंत्रणा लावली जाणार आहे.
- दोन महिन्यात काम पूर्ण होण्याची शक्यता
पहिल्या टप्प्यात ट्रॉमा केअर सेंटर व तीन अतिदक्षता विभागात (आयसीयू) फायर सेफ्टी लावण्याचे काम शुक्रवारपासून हाती घेतले जाणार आहे. दोन महिन्यात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे मेडिकल आणखी सुरक्षित होणार आहे.
- डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता, मेडिकल