टोळीयुद्ध व खंडणी वसुली : थोडक्यात बचावला प्रतिस्पर्ध्याचा साथीदार, पंकज धोटेचे कृत्य लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : टोळीयुद्ध व खंडणी वसुली यातून गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीतील बोरगाव येथे कुख्यात गुन्हेगार पंकज धोटे याने गोळीबार करून दहशत पसरवली. बुधवारी रात्री घडलेल्या या प्रकाराने शहर पोलीसही हादरले आहेत. या गोळीबारात पंकजचा प्रतिस्पर्धी सुमीत ठाकूर टोळीचा सदस्य थोडक्यात बचावल्याची माहिती आहे. पंकज हा माजी नगरसेवक मामा धोटे यांचा मुलगा आहे. त्याच्या विरुद्ध दंगा, हल्ला, मारहाण आणि खंडणी वसुलीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. तो पूर्वी नंदनवनमध्ये राहत होता. अनेक दिवसांपासून तो गोरेवाडातील शिवाजी चौक परिसरात राहतो. त्याचा अनेक दिवसांपासून सुमित ठाकूर टोळीशी वाद सुरू आहे. ‘मकोका’मध्ये जामिनावर सुटून आल्यापासून सुमित आपला व्यवसाय बंद करून वर्धेला रवाना झाला आहे. यामुळे गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीतील इतर गुन्हेगार सक्रिय झाले आहेत. पंकज धोटे हा गिट्टीखदान हद्दीत खंडणी वसुली करतो. बोरगावमधील व्यापाऱ्यांमध्ये त्याची दहशत आहे. काही वर्षांपूर्वी सुमित ठाकूरची या परिसरात दहशत होती. परंतु अलीकडे पिन्नू पांडे, पंकज धोटेसारखे गुन्हेगार दहशत पसरवून आपला दबदबा निर्माण करू पाहत आहेत. पंकज रात्री ७ वाजता आपल्या एका साथीदारासह बाईकवर बोरगावमधील दिनशॉ फॅक्ट्री चौकात पोहोचला. या चौकातच नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे यांच्या कार्यालयापासून थोड्याच अंतरावर शंभू कॅन्टीन नावाचे हॉटेल आहे. येथे सुमित ठाकूरचे जुने साथीदार नेहमीच बसून असतात. शंभू कॅन्टीन येताच पंकज आणि त्याचे साथीदार उतरले. पंकजने पिस्तुल काढून कॅन्टीनच्या दिशेने गोळी झाडली. कॅन्टीनसमोर कार उभी होती. कारला लागून गळी कॅन्टीनच्या दिशेने गेली. पंकजने तीन राऊंड फायर केले तर पोलीस मात्र एकच राऊंड फायर झाल्याचे सांगत आहे. गोळी झाडल्यानंतर पंकज आणि त्याचा साथीदार शंभू कॅन्टीनमध्ये गेले. पंकजने कॅन्टीनमध्ये तोडफोड केली. तो पिस्तूल दाखवित सुमित ठाकूरला शिवीगाळ करू लागला. पाच ते सात मिनिट गोंधळ घातल्यानंतर पंकज साथीदारासह फरार झाला. घटनेच्या वेळी दिनशॉ फॅक्टरी चौकात नागरिकांची ये-जा सुरू होती. त्यामुळे नागरिक घाबरले. गोळीचा आवाज ऐकून अनेकांनी आपापली दुकाने बंद केली तर रस्त्याने ये-जा करणारे लोक पळाले. घटनेची माहिती होताच झोन २ चे उपायुक्त राकेश ओला, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, एसीपी सोमनाथ वाघचोरे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंकजचा शोध सुरू केला. त्याच्या अनेक ठिकाणी धाड टाकली. कॅन्टीनमध्ये तोडफोड करताना तो सुद्धा जखमी झाल्याचे माहीत होताच अनेक रुग्णालयांमध्ये सुद्धा पाहणी केली, परंतु तो कुठेही सापडला नाही. घटनास्थळापासून गिट्टीखदान पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेचे कार्यालय केवळ एक कि.मी. अंतरावर आहे. पंकज धोटे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला यापूर्वीसुद्धा देशीकट्टा आणि काडतुसासह पकडण्यात आले होते. त्याला तडिपारही करण्यात आले होते. यानंतरही पोलीस त्याच्याबाबत माहिती मिळवू शकले नाही, हे अतिशय गंभीर आहे. पंकजची मोमीनपुऱ्यातील इप्पा टोळीशी मैत्री आहे. त्याच्याकडे इप्पा गँगच्या माध्यमातूनच शस्त्र येतात. शहर पोलिसांनी गुन्हेगारांवर नजर ठेवणे आणि नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवण्यासाठी ‘बीट सिस्टम’ लागू केली आहे. या घटनेमुळे बीट सिस्टमवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या १३ जून रोजी गुन्हेगार पिन्नू पांडेचा मावसभाऊ आशिष तिवारीने देशीकट्टा चालवून पाहण्याच्या नादात पत्नीवर गोळी चालविली होती. ही घटना लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु रुग्णालयाच्या माहितीवरून मानकापूर पोलिसांना खरा प्रकार समजला. पकडल्या गेल्यावर आशिषने पिन्नू पांडेने देशीकट्टा दिल्याचे सांगितले होते. एक महिना लोटूनही तो पोलिसांच्या हाती लागला नाही. दरोडा टाकण्याच्या तयारीतील प्रकरणात गुन्हे शाखा त्याचा अगोदरच शोध घेत आहे. फरार असतानाच त्याने आशिषला देशीकट्टा दिला होता.
बोरगावमध्ये गोळीबार
By admin | Published: July 13, 2017 2:29 AM