लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंगळवारी मध्यरात्री महापौरसंदीप जोशी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी हल्लेखोरांनी ७.६२ (सेव्हन पॉईंट सिक्स टू) पिस्तुलातील बुलेटचा (गोळीचा) वापर केला आहे. हे बुलेट महागडे असते. ते सराईत गुन्हेगारच वापरू शकतात. हा धागा धरून पोलिसांनी प्लॅनिंग अन् सुपारी घेऊन काम करणाऱ्या उपराजधानीतील अनेक गुन्हेगारांवर नजर रोखली आहे. दुसरीकडे गुन्हा कसा घडला, ते जवळून समजून घेण्यासाठी पोलिसांनी आज पुन्हा तसाच घटनाक्रम (रंगीत तालीम) घडवून घेतला.मंगळवारी, १७ डिसेंबरच्या रात्री नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटजवळ असलेल्या रसरंजन ढाब्यावरून जेवण करून परत येत असताना महापौर जोशी यांच्या वाहनावर (एमएच ३१/एफए २७००) हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कोणतीही गोळी जोशी यांना लागली नाही. मात्र, या घटनेने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. हिवाळी अधिवेशन सुरू असताना ही घटना घडल्याने हल्लेखोरांचा तातडीने छडा लावणे पोलिसांसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. त्यामुळे गोळीबाराचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असला तरी, शहरातील सर्वच्यासर्व पोलीस निरीक्षक अन् ३०० वर पोलीस या तपासात गुंतवण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पोलीस अधिकाऱ्यांना आज कितीही मनुष्यबळ आणि साधने वापरा मात्र शक्य तेवढ्या लवकर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळा, असे आदेश दिले.या गुन्ह्याच्या तपासात पारंपरिक पद्धतीसोबतच पोलीस उच्च तंत्रज्ञानाचाही वापर करीत आहेत. त्यामुळे पिस्तूल कोणते, बुलेट कोणती इथपासून तो या क्षेत्रातील सीसीटीव्ही, मोबाईल टॉवर, कॉलिंग, असा सगळा डाटा पोलिसांनी तपासणे सुरू केले आहे. दरम्यान, गुन्हा कसा घडला, ते जवळून बघण्यासाठी गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे तसेच डझनभर पोलिसांचा ताफा आज पुन्हा घटनास्थळ परिसरात गेला होता. त्यांनी घटनास्थळी मंगळवारी रात्री घडलेल्या घटनाक्रमाची रंगीत तालीम करून घेतली; नंतर तिकडे काही पुरावे मिळतात काय, त्याचीही चाचपणी केली. रात्रीच्या वेळी कुणी तिकडे पहारेदारी करीत होते का, त्याची माहिती मिळवत त्यांनाही विचारपूस केली.गुन्ह्याचे मायक्रो प्लॅनिंग !थंड डोक्याने तसेच सूक्ष्म धोके ध्यानात ठेवून या गुन्ह्याचे कटकारस्थान (मायक्रो प्लॅनिंग) करून हा गोळीबार करण्यात आला आहे. त्यामुळे अशी गुन्हेपद्धत कोणत्या गुन्हेगाराची आहे, त्याच्याकडे कोणकोणते नंबरकारी (समर्थक गुन्हेगार) आहेत, ते तपासण्यासाठीही अनेक खबरे कामी लागले आहेत. पोलीस आयुक्त, सहआयुक्त स्वत: तपासाच्या प्रत्येक घडामोडीची माहिती घेत आहेत. शिवाय तपासाला अडसर निर्माण करू पाहणारी कोणतीही माहिती बाहेर जाणार नाही, याचीही दक्षता घेतली जात आहे. पोलिसांनी आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त जणांना विचारपूस केली असून, संशयाच्या टप्प्यातील अनेकांची चौकशी सुरू आहे.गुन्हेगाारांना तातडीने पकडा!या गोळीबारामुळे भाजपात तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. गोळीबाराचा तीव्र निषेध नोंदवून भाजपाचे शहराध्यक्ष प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे यांच्या नेतृत्वात भाजपाच्या शिष्टमंडळाने सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गोळीबार करणाºया गुन्हेगारांना तातडीने अटक करा, अशी मागणी केली.