कन्हान (नागपूर) : माेटारसायकलवर आलेल्या दाेघांपैकी एकाने वेकाेलिच्या कन्हान (ता. पारशिवनी) नजीकच्या इंदर कोळसा खाण क्रमांक-६ येथे कर्तव्यावर असलेल्या सुरक्षारक्षकांवर गाेळीबार केला. त्यानंतर आराेपी पळून गेला. यात एक सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. ११) सायंकाळी ४ ते ४.३० वाजेच्या दरम्यान घडली.
मिलिंद समाधान खोब्रागडे (२९, रा. अकोला) असे गंभीर जखमी सुरक्षारक्षकाचे नाव आहे. मिलिंद एमएसपीएल नामक खासगी सुरक्षा एजन्सीमध्ये सुरक्षारक्षक पदावर नाेकरी करताे. ताे रविवारी सायंकाळी वेकाेलिच्या इंदर कोळसा खाण क्रमांक-६ च्या चेकपाेस्टवर कर्तव्यावर हाेता. त्यातच माेटारसायकलवर दाेघे त्या चेकपाेस्ट जवळ आले. त्यातील एकाने सुरक्षारक्षकांच्या दिशेने गाेळीबार केला. यात गाेळ्या लागल्याने मिलिंद गंभीर जखमी झाला.
आराेपी घटनास्थळाहून पळून जातात वेकाेलिच्या कर्मचाऱ्यांनी मिलिंदला लगेच कन्हान शहरातील वेकाेलिच्या रुग्णालयात आणले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्याला कामठी शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. दाेन गाेळ्या डाेक्यात, तर एक गाेळी पाेटात शिरली असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली असून, ताे अत्यवस्थ असल्याचेही वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. वृत्त लिहिस्ताे गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
आराेपीचे आत्मसमर्पण?
आराेपीचे नाव कळू शकले नाही. त्याच्याबाबत माहिती घेण्यासाठी ठाणेदार विलास काळे यांच्याशी वारंवार संपर्क साधला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आराेपीने पाेलिसांसमाेर समर्पण केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ताे खाण क्रमांक-४ भागातील रहिवासी असून, आधी मिलिटरीत हाेता. त्याच्यावर काेर्ट मार्शल अंतर्गत कारवाई करण्यात आली हाेती. नाेकरी गेल्यानंतर ताे मूळगावी राहायला आला, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्याने सुरक्षारक्षकांवर गाेळीबार का केला, हे मात्र कळू शकले नाही.
दाेन संशयित पाेलिसांच्या ताब्यात?
या प्रकरणात दाेन संशयितांना पाेलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. खापरखेडा पाेलिस ठाण्यात कार्यरत असलेले शैलेश यादव व स्थानिक गुन्हे शाखेचे नाना राऊत यांनी त्या दाेघांना ताब्यात घेतले आणि त्यांना घटनास्थळी नेल्याचेही सूत्रांनी सांगितले. मात्र, कन्हान ठाण्यातील पाेलिस अधिकाऱ्यांनी याला अधिकृत दुजाेरा दिला नाही. ते दाेघेही दुसऱ्या सुरक्षा रक्षकावर हल्ला करण्याच्या उद्देशाने आले हाेते. त्यांनी घाईघाईत केलेल्या गाेळीबारात मिलिंद खाेब्रागडे याला गाेळ्या लागल्या, असेही सूत्रांनी सांगितले. पाेलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी कन्हान पाेलिस ठाण्याला भेट देत घटनेबाबत जाणून घेतले.