ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 1 - क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात गुन्हेगारांनी एकाला बेदम मारहाण केली. तर, मदतीला धावलेल्या त्याच्या भावावर गोळी झाडली. सुदैवाने नेम चुकल्यामुळे मोहम्मद आसिफ अंसारी (वय २५) या तरुणाचा जीव वाचला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री १०.३० वाजता ही थरारक घटना घडली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. शनिवारी रात्री संघर्षनगरातील मैदानाजवळ एक लग्नसमारंभ होता. त्यात मोहम्मद राशिद उर्फ गोलू आपल्या नातेवाईक, मित्रमंडळीसोबत सहभागी झाला होता. येथे मोहम्मद फैजान उर्फ फैजूल (वय २१) मोहम्मद ऐहफाज (वय २०), फिरोज खान उर्फ सोनू (वय २३) आणि शेख शहजाद उर्फ पप्पू (रा. संघर्ष नगर, मेहबुबपुरा) हेसुद्धा आले होते. राशिदचा या चौघांतील एकासोबत वाद झाला. त्यांनी एकमेकांना मारहाण केली. त्यानंतर आरोपी धावले. त्यांनी राशिदला लाथाबुक्कयांनी बदडणे सुरू केले. ते पाहून राशिदचा भाऊ मोहम्मद आसिफ अन्सारी (वय २५, रा. संघर्ष नगर) भांडण सोडवायला गेला. आरोपींनी त्यालाही मारहाण केली आणि पिस्तुलातून आसिफवर गोळी झाडली. सुदैवाने नेम चुकल्याने पहिली गोळी हवेत वाकडीतिकडी गेली तर दुसरी गोळी झाडताना पिस्तूल लॉक झाले. त्यामुळे ती गोळी खाली पडली आणि आसिफचा जीव वाचला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. धावपळ आणि गोंधळामुळे समारंभातील पाहुण्यांनी कार्यक्रमस्थळावरून काढता पाय घेतला. माहिती कळताच यशोधरानगर पोलिसांचा ताफा घटनास्थळी धावला. आसिफच्या तक्रारीवरून एपीआय बांदेकर यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर फैजूल, ऐहफाज आणि फिरोजला पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले. तर, रविवारी सकाळी पप्पूलाही अटक करण्यात आली. पिस्तुल कुणाकडून आणले ? मावळत्या वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने शहरातील सर्वच भागात पोलिसांचा चांगल्यापैकी बंदोबस्त होता. मात्र, त्याला न जुमानता आरोपींनी गोळीबार करून आसिफचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातील आरोपींचा काही कुख्यात गुन्हेगारांशी संबंध आहे. हवालाची रोकड लुटणारा अन् काही दिवसांपूर्वी कत्तलखान्यात नेणारी जनावरे वाचविणा-यांवर गोळीबार करणा-या गुन्हेगारांसोबतही हे प्रकरण जोडले जात आहे. आरोपींनी त्या गुन्हेगारांकडूनच पिस्तूल आणले असावे, अशी चर्चा आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास केल्यास धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यशोधरानगरात गोळीबार : संघर्षनगरात क्षुल्लक कारणावरून संघर्ष
By admin | Published: January 01, 2017 3:34 PM