उमेश चौबे : ‘कलाशिखाओं के हस्ताक्षर’चे प्रकाशननागपूर : कुठलाही छंद जोपासल्यानंतर त्या छंदासाठी वेळ देणे गरजेचे असते. मनात ठाम निश्चय केल्यास कुठल्याही क्षेत्रात शिखर गाठता येते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार उमेश चौबे यांनी आज येथे केले. संवेदना प्रकाशन खापरखेडाच्यावतीने आयोजित लक्ष्मण लोखंडे यांच्या ‘कलाशिखाओं के हस्ताक्षर’ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. व्यासपीठावर नकलाकार राजाभाऊ चिटणीस, कवि ज्ञानेश वाकुडकर, लेखक लक्ष्मण लोखंडे उपस्थित होते. उमेश चौबे म्हणाले, लोखंडे यांच्या पुस्तकाकडे पाहून बालपण आठवले. बालपणी जुनी नाणी गोळा करण्याचा छंद होता. नकलातूनही हसतखेळत समाजाचे प्रबोधन करता येते. कुठलाही छंद जोपासण्यासाठी मनाचा ठाम निश्चय महत्त्वाचा आहे. त्यामुळेच मनात आणलेली शहीद स्मारकाची, पत्रकार भवनाची कल्पना मी साकारू शकलो. लोखंडे यांच्या पुस्तकातून मनाचा निश्चय करण्याचा संदेश समाजाला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. कवि ज्ञानेश वाकुडकर यांनी कुतूहल ही सर्व कलांची जननी असल्याचे मत व्यक्त केले. नकलाकार राजाभाऊ चिटणीस म्हणाले, नकलांच्या छंदामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रसिद्धी मिळाली. नकलांच्या क्षेत्रात १५ शिष्य तयार केल्याचे सांगून कुठलाही छंद टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी जिद्द, चिकाटी अंगी बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले.पुस्तकाचे लेखक लक्ष्मण लोखंडे यांनी आपल्या छंदाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, विमानतळावर काम करताना ए. के. हंगल यांच्यापासून स्वाक्षरी घेण्यास सुरुवात केली. पुढे शत्रुघ्न सिन्हा, दादा कोंडके, जया बच्चन यांची स्वाक्षरी घेतली. दारासिंग, रंधवा आणि रशियाचा पहेलवान कुस्तीसाठी आलेले असताना त्यांच्या स्वाक्षरी घेतल्या. त्यावेळी दारासिंग आणि रंधवा यांनी १०-१० रुपये दिले तर रशियाच्या पहेलवानाने दिलेला अमेरिकन डॉलर अजूनही सांभाळून ठेवला आहे. याशिवाय २७ वर्षाच्या नोकरीच्या पेमेंट स्लिपही जमा केल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रसेनजित गायकवाड यांनी केले. संचालन पौर्णिमा मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
ठाम निश्चय केल्यास गाठता येते शिखर
By admin | Published: July 20, 2015 2:58 AM