लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) एमबीबीएसचा ५० जागांवर गेल्या वर्षी प्रवेश देण्यात आला. यावर्षी १०० जागांवर प्रदेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांची ही पहिली बॅच ‘एम्स’च्या स्वत:च्या इमारतीतून म्हणजे मिहानमधून सुरू होणार आहे. या शिवाय, ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यापर्यंत बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्यात येईल, अशी माहिती ‘एम्स’च्या संचालक डॉ. विभा दत्ता यांनी दिली.मिहानमधील २०० एकर परिसरात ‘एम्स’चे बांधकाम होत आहे. स्वत:ची इमारत नसल्याने सप्टेंबर २०१८ पासून मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचे वर्ग सुरू करण्यात आले. पहिले वर्ष व अपुऱ्या जागेमुळे ५० जागेवरच प्रवेश देण्यात आले होते. मात्र २०१९-२० या वर्षात १०० जागांवर प्रवेश दिले जाणार आहे. या विषयी अधिक माहिती देताना डॉ. दत्ता म्हणाल्या, मिहानमध्ये एम्सचा इमारतीचे बांधकाम वेगाने सुरू आहे.विद्यार्थ्यांचे वसतिगृह, डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे निवासी गाळे व कॉलेज इमारतीच्या बांधकामाला प्राधान्य देण्यात आले आहे. नुकतेच वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश दिला जाणाऱ्या १०० विद्यार्थ्याना या वसतिगृहात ठेवले जाईल. परंतु त्यांचे वर्ग मिहानमध्ये सुरू करायचे की मेडिकलमध्ये यावरील निर्णय उपलब्ध सोयींवर अवलंबून आहे. यामुळे वेळेवर या विषयी निर्णय घेतले जातील. मिहानमध्येच वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचेही डॉ. दत्ता म्हणाले.
‘ओपीडी’साठी यंत्रसामुग्री होत आहे उपलब्धडॉ. दत्ता म्हणाले, मिहानमधील ‘एम्स’च्या इमारतीतून ‘ओपीडी’ सुरू करण्यासाठी लागणारे साहित्य व यंत्रसामुग्री उपलब्ध होत आहे. यामुळे सप्टेंबर महिन्यापर्यंत ‘ओपीडी’ सुरू होईल. या शिवाय, १० खाटांचा वेगळा वॉर्ड तयार केला जात आहे. येथे गंभीर रुग्णांवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मेडिकलमध्ये पाठविले जाईल.
बांधकाम वेगाने सुरू‘एम्स’च्या इमारतीचे बांधकाम वेगाने सुरू आहे. जसजसे बांधकाम पूर्ण होईल व आवश्यक साहित्य उपलब्ध होतील तसतसे वर्ग खोल्या, ‘लॅब’ सुरू केल्या जातील. परंतु तूर्तास तरी एमबीबीएस दुसऱ्या वर्षाला असलेल्या ५० विद्यार्थी मेडिकल कॉलेजमधील वसतिगृहात राहतील आणि येथेच शिक्षणही दिले जाईल.