नागपूर : कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेपासून अर्थात होळीपासून बंद झालेली नाट्यगृहे शुक्रवार, २२ ऑक्टोबरपासून पुन्हा उघडली आहेत. शासनाने जारी केलेल्या निर्देशानुसार रंगकर्मी सांस्कृतिक क्षेत्राच्या अनलॉकचा सोहळा साजरा करण्याची तयारी सुरू केली होती. त्याच अनुषंगाने शुक्रवारी नाट्यगृहे उघडताच नाटकाची पहिली घंटा वाजली.
सांस्कृतिक क्षेत्र अनलॉकच्या अनुषंगाने शुक्रवारी राष्ट्रभाषा परिवारच्या वतीने ‘फर्स्ट बेल ऑन स्टेज’ या उपक्रमाची घोषणा केली होती. या महोत्सवात हेमेंदू रंगभूमी, नागपूरच्या वतीने ‘अवतरण - मी पुन्हा पुन्हा येतो’ हे प्रवीण खापरे लिखित व जयंत बन्लावार दिग्दर्शित एकांकीकेचे सादरीकरण झाले. मदनलाल धिंग्रा या क्रांतिकारक युवकावर आधारित हे नाटक होते. स्वातंत्र्यपूर्व काळातील ११३ वर्षांपूर्वीचा लंडमधील घटनाक्रम या एकांकिकेत सादर होता.
त्यानंतर राष्ट्रभाषा परिवारच्या वतीने ‘सवा सेर गेंहू’ या मुन्शी प्रेमचंद यांच्या कथेवर आधारित व सचिन बुरे दिग्दर्शित एकांकिकेचे सादरीकरण झाले. गरीब-श्रीमंतीची दरी आणि गुलामीवर प्रहार करणारे हे एकांक होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजाराम शुक्ल व सचिव बाबूजी अग्रवाल उपस्थित होते. यासोबतच निर्मोही संस्थेच्या वतीने कविवर्य सुरेश भट सभागृहात स्वानंद सांस्कृतिक मंडळ निर्मित रोशन नंदवंशी लिखित व दिग्दर्शित ‘काही क्षण आयुष्याचे’ या दोन अंकी नाटकाचे सादरीकरण झाले. या दोन्ही ठिकाणच्या नाटकांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि सांस्कृतिक क्षेत्र अनलॉक होण्याचा क्षण साजरा केला.
..................