लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - राज्यातील पहिला पक्षी सप्ताह गुरुवारपासून सुरूही झाला. मात्र कसलेही नियोजन न करता किंवा कार्यक्रमांची आखणी न करता केवळ औपचारिक उद्घाटन करून या सप्ताहाला प्रारंभ झाला आहे.
अंबाझरी जैवविविधता उद्यानात पक्षी सप्ताहाचे औपचारिक उद्घाटन राज्याचे मुख्य वन्यजीव रक्षक एम.के. राव यांच्या हस्ते झाले. शिकाऱ्यांनी पकडलेले २६ पोपट या वेळी मुख्य वन्यजीव रक्षकांच्या हस्ते निसर्गमुक्त करण्यात आले. अंबाझरी जैवविवधता उद्यानाने स्थानिक स्तरावर नियोजन केले आहे. हा अपवाद वगळता अनेक ठिकाणी सप्ताहाची आखणी नाही. राज्याचे मुख्य वन कार्यालय नागपुरात आहे. मात्र सप्ताहाच्या उपक्रमाची आखणी, उपक्रमाचे वेळापत्रक तयार होऊ शकलेले नाही. त्यामुळे वनवृत्तांमध्ये जमेल तसा कार्यक्रम आखून पहिल्या वर्षाच्या सप्ताहाची औपचारिकता दिसली.
सप्ताहाच्या काळामध्ये जनजागृतीसाठी उपक्रम आखण्याचे ठरले आहे. विविध स्पर्धा, कार्यशाळा, माहितीपट इत्यादीचे आयोजन करण्याचाही उल्लेख आहे. स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास असलेल्या ठिकाणी उपक्रम घ्यायचे आहेत. प्रत्यक्षात काही ठिकाणचे अपवाद वगळता वनविभागाने अशा कार्यक्रमाची आखणी केलेली नाही. पक्षी सप्ताहाच्या तोंडावर नागपूर जिल्ह्यात माळढोक दिसला. वनविभागाने त्याच्या संवर्धनासाठी अद्याप पुढाकार घेतल्याचेही दिसत नाही. पक्षी व त्यांच्या अधिवासाच्या संरक्षणाच्या दृष्टीने जलसंपदा, कृषी व पोलीस विभाग यांनाही यात सहभागी करण्याच्या सूचना असल्या तरी यासंदर्भात तसा पत्रव्यवहार संबंधित कार्यालयाकडे झालेला नाही.
एनजीओ आणि सामाजिक संघटनांच्या खांद्यावर भार
ही मागणी मुळात पक्षिप्रेमी संघटनांची होती. त्यामुळे अनेक ठिकाणी पक्षिप्रेमी संघटनांनी स्वतहून पुढाकार घेऊन सप्ताहातील उपक्रमांची आखणी केली आहे. काही ठिकाणी वनविभागाचे नाव अशा आयोजनासोबत जोडण्यात आले असले तरी, या पहिल्या सप्ताहाचा भार एनजीओ आणि सामाजिक संघटनांवरच दिसत आहे.
सोलापुरात वाचनालय, नागपुरातील उद्यानाच्या नामकरणाचे काय?
सोलापूर वनविभागाकडून ज्येष्ठ पक्षी अभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या सर्व पुस्तकांचे एक संग्रहालय आणि वाचनालय चितमपल्ली यांचे नाव देऊन सोलापुरात सप्ताहाच्या पहिल्या दिवशी सुरू झाले. मात्र नागपुरातील अंबाझरी जैवविविधता उद्यानाला मारुती चितमपल्ली बर्ड पार्क असे नाव देण्याचा मूहूर्त कधी निघणार, हे मात्र अद्यापही स्पष्ट नाही.