लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यातील ७२१ गांवांचा समावेश असलेल्या नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एनएमआरडीए) च्या सन २०१८-१९ या वर्षाच्या १,७५९.७१ कोटींच्या पहिल्या अर्थसंकल्पास सोमवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीस मंजुरी देण्यात आली. महानगर आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पातील तरतुदींचा विचार करता महानगर क्षेत्रातील विकास कामांना गती मिळणार आहे.पुढील वित्त वर्षात रिंग रोड जंक्शनवर लॉजिस्टिक पार्क उभारणे, विभागीय कार्यालयांची स्थापना, कचऱ्यापासून इंधन तयार करण्याचा प्रकल्प उभारणे, महानगर क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून देणे, कामठी रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर उभारणे, स्वदेश योजनेअंतर्गत दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेसचा विकास, श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान तीर्थस्थळाचा विकास आदी प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. तसेच फुटाळा तलाव परिसराचे सुशोभिकरण करणे, अनधिकृत बांधकामे नियमित करून घेण्यास मुदतवाढ देणे आदी विविध विषयांनाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली.यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा.कृपाल तुमाने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, प्रा. अिनल सोले, डॉ. परिणय फुके, डॉ. मिलिंद माने, समीर मेघे, गिरीश व्यास, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, महापालिका आयुक्त अश्विन मुदगल आदी उपस्थित होते.एक लाख घरे बांधण्याचे नियोजनएनएमआरडीएने आपल्या क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत किमान १ लाख घरे बांधण्याचे नियोजन करावे. तसेच या क्षेत्रातील आरक्षित भूखंडावर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र सूदूर संवेदन उपयोजन केंद्र (एमआरएसएसी)ची मदत घेऊन यंत्रणा उभी करावी. तसेच या भूखंडांवरील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना जबाबदारी द्यावी.असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले.
१८८ पदांच्या आकृतीबंधाला मंजुरीमहानगर क्षेत्रातील बिना मंजुरी उभारण्यात आलेल्या भूखंड,अभिन्यास,बांधकामे यांना प्रशमन संरचना म्हणून घोषित करण्यासाठी अर्ज स्विकारण्याची मुदत ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत वाढविण्यासही यावेळी मंजुरी देण्यात आली. तसेच प्राधिकरणाच्या १८८ पदांच्या आकृतीबंधास यावेळी मंजुरी देण्यात आली. यामुळे प्राधिकरणाच्या कामाला गती मिळणार आहे.
जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास अर्थसंकल्पाशिवाय एनएमआरडीए क्षेत्राअंतर्गत खडका-किरमीटी-शिवमडका, सुमठाणा-पांजरी आणि सुमठाणा ते परसोडी या दोन योजनांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत वाकी, आदासा, धापेवाडा, पारडसिंगा, छोटा ताजबाग, तेलंगखेडी, गिरडा या धार्मिक सर्किट अंतर्गत तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. फुटाळा तलाव येथे संगीत कारंजे, लाईट साऊंड व लेझर शो तसेच अंबाझरी उद्यान येथे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित लाईट व साउंड व लेझर मल्टिमीडिया शो उभारण्यासही मंजुरी देण्यात आली.
अर्थसंकल्पातील खर्चाच्या ठळकबाबी
- अल्प उत्पन्न गटासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ७०० कोटी
- श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी तीर्थस्थळाचा विकास १२२ कोटी
- सुधार योजनेतील विकास कामे -७० कोटी
- रस्ते व पूलांची कामे ४० कोटी
- सांडपाणी व्यवस्थापन १० कोटी
- फुटाळा तलाव येथे संगीत कारंजे व अंबाझरी उद्यान येथे मल्टिमीडिया शो उभारणे ३० कोटी
- श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानचा विकासासाठी २६ कोटी
- चिंचोली येथील शांतीवनमधील संग्रहालयाच्या आधुनिकीकरण २८.२५ कोटी
- स्वदेश योजनेअंतर्गत दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेसचा विकास ३० कोटी
- ड्रॅगन पॅलेस परिसरात मूलभूत सुविधा उभारणे २० कोटी
- उत्तर नागपूरमधील कामठी रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडर कन्व्हेंशन सेंटर उभारणे ८९.६४ कोटी