लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नागपुरातील पहिला रुग्णाला मंगळवारी १४ दिवस पूर्ण झाले. या रुग्णाची प्रकृती उत्तम आहे. आज सकाळी नमुने घेण्यात आले तर बुधवारी सकाळी पुन्हा नमुने घेतले जाणार आहेत. हे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्यास रुग्णाला रुग्णालयातून सुटी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील १४दिवस त्यांना होम क्वारंटाइन म्हणजे घरीच राहणे बंधनकारक असणार आहे. देशाता कोरोना विषाणूच्या आजाराची व्याप्ती वाढत चालली आहे. नागपुरात याचा शिरकाव ११ मार्च रोजी झाला. अमेरिका प्रवासाची पार्श्वभूमी असलेले ४५ वर्षीय पुरुष ६ मार्च रोजी नागपुरात आले. प्रकृती खालवल्याने ११ मार्च रोजी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल झाले. याच दिवशी त्यांचे नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आले. अहवालात त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांना मेयोच्या वॉर्ड क्र २४ या आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी, १२ मार्च रोजी त्यांच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींची आणि संपर्कात आलेल्यांच्या नमुन्यांची तपासणी केली. यात त्यांच्या ४३ वर्षीय पत्नी व अमेरिका प्रवासात त्यांच्यासोबत असलेला ४५ पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शनिवारी आणखी एक रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. सलग चार रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. सुरुवातीपासून पहिल्या ४५ वर्षीय पुरुष रुग्णाची प्रकृती उत्तम होती. सात दिवसानंतर या रुग्णाचे नमुने तपासले असता ते निगेटिव्ह आले. परंतु बाधित रुग्णांना १४ दिवस रुग्णालयात ठेवण्याचा नियम असल्याने आज मंगळवारी त्यांचे उपचाराचे दिवस पूर्ण झाले. रुग्णालयातून सुटी देण्यापूर्वी १२ तासांच्या अंतराने नमुने घेण्यात येणार आहेत. ते निगेटिव्ह आल्यावरच रुग्णालयातून सुटी मिळणार आहे. यामुळे आता सर्वांनाच त्यांच्या नमुन्याचा अहवालाची प्रतीक्षा आहे.
नमुने निगेटिव्ह आल्यावरच रुग्णालयातून सुटीपहिल्या बाधित ४५ वर्षीय पुरुषाला मंगळवारी १४ दिवस पूर्ण झाले आहेत. यामुळे आज त्यांचे सकाळी नमुने घेण्यात आले. १२ तासानंतर पुन्हा नमुने घेतले जातील. हे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्यावरच रुग्णालयातून सुटी देण्याचा निर्णय घेतला जाइल. सध्या त्यांना कुठलेही लक्षणे नाहीत.-डॉ. तिलोत्तमा रमेश पराते, प्रमुख, मेडिसीन, मेयो