लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर विद्यापीठ वर्तुळात भीतीचे वातावरण होते व लसीकरणाची व्यवस्था करण्याची मागणी होत होती. प्रशासनाने अखेर मागणी मान्य केली असून विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय चौक परिसरात स्थित आरोग्य केंद्रात लसीकरण होणार आहे. त्याअगोदर सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना कोरोनाची चाचणी करावी लागणार आहे.
यासंदर्भात विद्यापीठाने मंगळवारी अधिसूचना जारी केली. विद्यापीठातर्फे १९ व २० मे रोजी कोरोना चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे. तर २१ ते २४ मे या कालावधीत लसीकरण होणार आहे. मनपाच्या सहकार्याने ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत विद्यापीठातील अनेक कर्मचारी कोरोनाबाधित झाले असून सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कर्मचारी संघटनांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. लोकमतने लसीकरणाची आवश्यकता व कर्मचाऱ्यांमधील भीतीच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला होता.