लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. आज गुरुवारी पहिल्या दिवशी २४ व्यक्तींनी ३३ अर्ज नेले. परंतु एकही अर्ज सादर झालेला नाही.
विशेष म्हणजे निवडणूक कार्यक्रमानुसार १२ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येईल. १३ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होईल. १७ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येईल. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होईल. ३ डिसेंबर रोजी मतगणना होईल. ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढली जात नाही. सध्या काँग्रेस व भाजप या दोघांनीही आपले पत्ते उघडलेले नाहीत. उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर उमेदवारी अर्ज सादर होण्यास गती मिळेल. प्रमुख उमेदवार ११ किंवा १२ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज सादर करण्याची शक्यता आहे.