लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली. नागपूर बोर्डाने स्थापन केलेल्या भरारी पथकाच्या अहवालानुसार इंग्रजीच्या पेपरला कॉपीची केवळ ११ प्रकरणे पुढे आली. या अहवालाच्या आधारावर बोर्डाचे अधिकारी कॉपीमुक्त अभियान यशस्वी झाल्याचा दावा करीत असले तरी, अधिकाऱ्यांचा दुसरा वर्गाने या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहे. सोबतच विभागातील अनेक परीक्षा केंद्रात मोठ्या प्रमाणात कॉपी चालल्याचा दावाही केला आहे. त्यांनी खाजगीत खुलासा केला की, पहिल्याच दिवशी भरारी पथकाने केवळ खानापूर्ती केली.बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार परीक्षेच्या दरम्यान कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी ४५ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. सोबतच विभागीय कार्यालयाकडून ५ दक्षता पथकाची नियुक्ती केली होती. शिवाय एका पथकाला परीक्षा केंद्राच्या चित्रीकरणाची जबाबदारीही दिली होती. ४५ पैकी ३५ भरारी पथकांनी कॉपीमुक्त अभियान यशस्वी झाल्याचा अहवाल बोर्डाला दिला आहे. पथकाने दिलेल्या अहवालाची बोर्डाने तपासणी केली काय, असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारला असता, बोर्डाचे विभागीय अध्यक्ष रविकांत देशपांडे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी कुठलेही उत्तर दिले नाही. हे सुद्धा स्पष्ट केले नाही, की भरारी पथक कुठल्या केंद्रावर गेले होते. यासंदर्भात बोर्डाच्या अधिकाऱ्याकडे माहिती नाही. सूत्रांनी सांगितले की, बहुतांश भरारी पथकांनी निरीक्षणाच्या नावावर केवळ खानापूर्ती केली. आजूबाजूच्या केंद्राला भेटी देऊन अहवाल दिला. काही भरारी पथकाने दिवसभरात एक अथवा दोन केंद्रालाच भेट दिली.सूत्रांच्या मते गोंदिया जिल्ह्यात गोंदिया शहर, सडकअर्जुनी, आमगाव हा भाग कॉपीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील तुमसर, लाखनी, वरठी, साकोली व भंडारा शहरात सुद्धा कॉपी मोठ्या प्रमाणात होतात. वर्धा जिल्ह्यात देवरी, आष्टी, वर्धा शहर, समुद्रपुर, नांदगाव तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी कॉपीसाठी प्रसिद्ध आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक, पारशिवनी, मौदा, काटोल, जलालखेडा, हिंगणा, कुही, कामठी, नरखेड या भागात सुद्धा कॉपी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे बोर्ड या क्षेत्रातील परीक्षा केंद्रावर विशेष लक्ष ठेवते. यावेळी या सर्व भागातून कॉपी सापडल्याचे एकही प्रकरण पुढे आले नसल्याचा दावा करण्यात येत आहे. पण बोर्डाच्या अधिकाऱ्यांना या दाव्यावर विश्वास नाही.सर्व काही ठिक आहेयासंदर्भात बोर्डाचे विभागीय अध्यक्ष रविकांत देशपांडे यांच्याशी संपर्क केला असता, अहवालाचा हवाला देत म्हणाले की, आतापर्यंत आलेल्या अहवालाच्या आधारे कॉपी सापडल्या नाही.इंग्रजीचा पेपर आणि ११ कॉपीसूत्रांच्या मते इंग्रजीचा पेपर विद्यार्थ्यांसाठी कि लर ठरतो. यावर्षी तर इंग्रजीच्या अभ्यासक्रमाचा पॅटर्न बदलला आहे. नवीन पॅटर्न असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीती होती. गेल्या वर्षी इंग्रजीच्या पेपरला अनेक केंद्रावर पोते भरून कॉपी निघाल्या होत्या. परंतु यावर्षी केवळ ११ कॉपी सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.कुठे उत्तरपत्रिका तर कुठे प्रश्नपत्रिका कमी पडल्यासूत्रांच्या मते परीक्षा सुरू झाल्यानंतर विभागात २१ केंद्रावर उत्तर पत्रिका कमी पडल्या तर ७ केंद्रावर प्रश्नपत्रिका कमी पडल्या. काही केंद्रावर विद्यार्थ्यांना दिलेल्या उत्तर पत्रिका कमी दर्जाच्या होत्या. विद्यार्थ्यांनी त्याची माहिती पर्यवेक्षकांनाही दिली. केंद्र संचालकांनी याची माहिती बोर्डाकडे दिली. पण विद्यार्थ्यांना त्याच उत्तरपत्रिकेवर पेपर सोडविण्यास सांगण्यात आले.कॉपीमुक्त अभियानाचा दबावसूत्रांचे म्हणणे आहे की, बोर्डाने कॉपीमुक्त अभियान राबविले आहे. या अभियानात स्वत:ला यशस्वी ठरविण्यासाठी बोर्डाने परीक्षेत होणाऱ्याकॉपीकडे दुर्लक्ष केले आहे.