लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने आजपासून आठवडाभर लॉकडाऊन लावला. या वेळचा लॉकडाऊन हा अनेक गोष्टींनी वेगळा आहे. यावेळी अनेक गोष्टीमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. कारखाने, बांधकामे, वाहतूक व्यवस्था आदी सुरु आहे. त्यामुळे बाजारपेठा बंद होत्या. परंतु अनेक गोष्टी सुरु असल्यामुळे रस्त्यांवर वर्दळ दिसून आली. बंदमुळे काहींचा व्यवसाय बुडत आहे तर काहींचा सुरू असल्याने हाताला काम मिळत आहे. त्यामुळे सोमवारी लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी नागपुरात कही खुशी कही गम दिसून आले.
सोमवारपासून शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू झाले आहे. २१ मार्चपर्यंत चालणाऱ्या या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा प्रशासनाने केला असून असेच सहकार्य करण्याचे आवाहनही केले आहे. महानगरपालिका क्षेत्रासह कामठी, हिंगणा, सोनेगाव, कोरोडी, कळमना, हुडकेश्वर आदी पोलीस ठाणे हद्दीतील गावांमध्येही लॉकडाऊन लावण्यात आला आहे. दरम्यान लोकांची गर्दीही दिसून आली. त्यांचे म्हणणे होते की, उद्योग-कार्यालये सुरु असल्याने त्यांना घराबाहेर निघावेच लागेल. असे असले तरी कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता असलेल्या बाजारपेठा बंद होत्या. शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था, धार्मिक व राजकीय सभा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, सभागृह, मंगल कार्यालय, लॉन, दारुची दुकाने, रेस्टारंट, हॉटेल, सिनेमागृह आदी बंद असल्यामुळे शहरतील गर्दीवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण आले. यासोबतच आजपासून बँकांचाही संप होता. त्यामुळे शहरातील गर्दीवर चांगलेच नियंत्रण आले.
जागोजागी पोलीस पण सौजन्याची वागणूक
लॉकडाऊन दरम्यान शहरात जागोजागी पोलीस तैनात होते. तब्बल १०७ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. परंतु यावेळी कुणावरही सक्ती करण्यात येत नव्हती. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली, अनेकांचे चालानही कापले. मात्र नागरिकांना त्रास दिला नाही. एकूणच पोलिसांकडून सौजन्याची वागणूक नागरिकांना मिळाली. असे असले तरी जिल्हा प्रशासनाने पोलिसांना उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. मागणी केल्यास ओळखपत्र दाखवावे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय शहरात येण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही केले आहे.
असा राहिला लॉकडाऊन
- भाजीपाला मुबलक, पण भाव गडगडले
- मध्यप्रदेश छत्तीसगडचे मजूर आपापल्या गावी परतले
- कळमना बाजारात पहिल्याच दिवशी ८५ टक्के गर्दी ओसरली
- गिट्टीखदानमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनीच केला विरोध