नागपूर : पहिल्यांदाच शिक्षणाचा श्रीगणेशा करण्यासाठी ज्ञानमंदिरात आज उत्साहाचे वातावरण होते. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर सत्राच्या पहिल्याच दिवशी शाळा सुरू होत असल्याने शाळांनीही प्रवेशोत्सवाची जय्यत तयारी केली होती. विद्यार्थ्यांचे आगमन होताच पुष्पांचा वर्षाव त्यांच्यावर झाला. कुमकुम टिळा लावून त्यांचे औक्षण करण्यात आले. पहिल्यांदाच शाळेत पाय ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांची रडारडीही अनुभवायला मिळाली. पण चॉकलेटचा खाऊ मिळाला आणि हिरमुसलेल्या चेहऱ्यावर आनंद फुलला. प्रवेशाचा स्वागत सोहळा काही शाळांमध्ये रंगतदार ठरला.
शासनाने यंदा २७ जून रोजी शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले. पण पहिले दोन दिवस पूर्वतयारीसाठी शाळांना दिले. पण ज्या शाळांची पूर्वतयारी आधीच झाली होती. किंवा ज्या शाळा विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत होत्या, त्या शाळांनी २७ जून रोजीच प्रवेशोत्सव साजरा केला. शहरातील काही कॉन्व्हेंटमध्ये व ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये सोमवारपासूनच शाळेला सुरुवात झाली. शाळेच्या प्रवेशद्वारावर पुष्परचना व रांगोळ्या घातल्या गेल्या. काही शाळांनी वाद्यांच्या तालावर विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांचे टिळा लावून औक्षण करण्यात आले.
खरी गंमत रंगली ती पहिल्यांदा शाळेत येणाऱ्या बच्चेकंपनींची. मुलगा पहिल्यांदा शाळेत जात असल्याने आई-बाबा दोघेही शाळेत सोडायला आले. शाळेत आई-बाबांना सोडून राहायचे असल्याने मुलांनी चांगलीच रडारडी केली. मुलगा शाळेत बसतो की नाही म्हणून आईबाबांची घालमेल सुरू झाली. कसाबसा शिक्षकांनी मुलाचा आईपासून हात सोडविला. पण रडणे काही थांबे ना... अखेर चॉकलेट, बिस्किटांचा खाऊ आला. शाळेतील खेळणी मुलांपुढे ठेवली गेली. अन् हिरमुसलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्याची पालवी फुलली. काही शाळेत पहिल्याच दिवशी मुलांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले. सरस्वती पूजन, परिपाठ, श्लोक, प्रार्थना झाली. माध्यान्ह भोजनात मसाले भात आणि मिठाई देण्यात आली. नव्या मित्रांशी गट्टी झाली. शाळेत पुन्हा चिमुकल्यांची किलबिल सुरू झाली.
- २९ जूनला होणार सरकारी शाळेत प्रवेशोत्सव
स्थानिक स्वराज्य संस्था व काही अनुदानित शाळेत २९ जून रोजी अधिकृत प्रवेशोत्सव साजरा होणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने शिक्षकांना प्रवेशोत्सवाचे नियोजन करण्यास सांगितले आहे. पहिल्याच दिवशी मुलांना गणवेश व पुस्तके मिळावीत यासाठी नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.