नागपूर : जैव इंधनावर वाहने चालविण्याचा प्रयोग झाला असून एलएनजी म्हणजेच लिक्विडीफाईड नॅचरल गॅस वर चालणारी बस नागपुरात तयार करण्यात आली आहे. ही बस काही दिवसातच नागपूर ते रायपूर दरम्यान धावणार आहे. भंडारा व रायपूरमध्ये एलएनजी स्टेशन उभारून मध्यभारतात एलएनजीची उपलब्धता कमालीची वाढणार आहे.
इंधनावर होणारा खर्च कमी करण्यासाठी ३ ठिकाणी बायो एलएनजी स्टेशन उभारण्यात येणार असून यामुळे वायु प्रदूषणाचे प्रमाण कमी होणार आहे. सध्या नागपुरात सुरू असलेल्या ऍग्रो व्हिजनच्या कृषी प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या बसबाबत नागरिकांमध्ये कमालीचे कुतुहल असून ही बस आकर्षणाचा विषय ठरली आहे.
बायो एलएनजी म्हणजेच जैव इंधन निर्मिती कृषी कचरा, सेंद्रीय कचरा, उद्योगांमधील कचा, घरामधून निघणारा कचरा यापासून निर्माण केले जाते. याचा वापर डिझेल वाहनांमध्ये केल्यास प्रदूषण मोठ्या प्रमाणावर कमी करण्यास मदत होणार आहे. या जैव इंधनावर वाहने चालविण्याचा प्रयोग यशस्वीरित्या पार पडला असून आयएसओ मानक १५५०० या अंतर्गत डिझेलवर चालणारी बस पूर्णपणे जैव इंधनावर चालविण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
सामंजस्य करारांतर्गत भंडारा जिल्ह्यातील मासळ येथे जैवइंधन केंद्र उभारले जाणार आहे. याशिवाय नागपूर व रायपूर येथेही अशा केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. सोबतच, नागपूर व रायपूरदरम्यान पहिली जैवइंधनावर चालणारी बससेवा प्रायोगिक तत्वावर लवकरच सुरू केली जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास पुढील कालावधीत मोठ्या प्रमाणात वाहने जैवइंधावर चालविण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचा मानस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.