मुंबई - कोरोनामुळे अवघा देश लॉकडाऊन होता, पण या संकटातही बळीराजा आपल्या शेतात राबत होता, धान्य पिकवत होता. पिकलेलं धान्य काढत होता. त्यामुळेच लॉकडाऊन कालावधीत घरात अडकलेल्या जनतेला फळं, भाज्या आणि दूध सहजतेनं मिळत होतं. देश थांबला होता, जग थांबला होता. पण, काळ्या मातीत मातीत... म्हणत बळीराजाचं काम सुरुच होतं. शेती जशी भाकर देते तशीचा ती शेतकऱ्याच्या कुटुंबाचा भारही सोसते. नागपूरमधील अशाच एका शेतकऱ्याने खजूर शेती करुन तब्बल 8 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे.
नागपूर जिल्ह्यातील सेवी थंगवेल (Savi Thangavel) यांची खजूर शेती निराशेच्या वातावरणात नवी उमेद देणारी ठरली आहे. कोरोनाच्या संकटातंही लाखो शेतकऱ्यांप्रमाणे तेही शेतात राबले आणि आता त्यांच्या खजुराचं पीक विक्रीला आलंय. दोन एकरात आठ लाख रुपये उत्पन्नाचा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ही पहिली खजूर शेती आहे. सेवी थंगवेल यांनी 2009 मध्ये दीड एकरात खजुराच्या 130 झाडांची लागवड केली. त्यांना चार वर्षानंतर उत्पादन सुरु झालं. दरवर्षी 8 ते 10 लाखांचे उत्पन्न अपेक्षित असून हे 70 वर्षे चालणारं पीक आहे.
सेवी थंगवेल यांनी हवामान बदल, कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ अशा बिकट परिस्थितीत योग्य नियोजन करुन, नागपुरात खजूर शेती करुन दाखवली. गेल्या अनेक वर्षांपासून या शेतीतून लाखो रुपयांचा नफाही त्यांनी कमावला. थंगवेल हे नागपूरपासून 15 किलोमीटर अंतरावरील मोहगाव झिल्पी या गावात साधारण 10 वर्षापासून खजूर शेती करत आहेत. त्यांच्या या खजूर शेतीचा प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी, पर्यटक गावाला भेट देतात.
तामिळनाडूला जाऊन सेवी यांनी खजूर शेतीचा अभ्यास केला. तिकडूनच रोप मागवले आणि दीड एकरात लागवड केली. एकतर कमी पाणी आणि उष्ण हवामान खजूर पिकाला पोषक आहे. त्यामुळेच विदर्भातील वातावरणाचा फायदा सेवी यांनी खजूर शेतीसाठी करुन घेतला. ठिबकने शेतीला पाणी पुरवलं आणि शेणखत दिलं. त्यामुळे सातव्या वर्षापासूनच त्यांना उत्पादन मिळण्यास सुरू झालं.सेवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, खजुराच्या एका झाडापासून जवळपास 300 किलोपर्यंतचं उत्पादन मिळतं. बाजारात सध्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत ओल्या खजुरांचा दर 700 ते 1000 रुपये प्रतिकिलो असा आहे. त्यावरुन सेवी थंगवेल यांच्या खजूर शेतीचा अंदाज बांधता येईल
अंतरपीक घेता येते
साधारण 25 बाय 25 अंतरावर 3 बाय 3 खड्डा खणून, त्यामध्ये शेणखत आणि माती टाकून लागवड केली जाते. त्यामुळे दोन झाडांच्या मध्ये तुम्ही अंतरपीक घेऊ शकता, असं सेवी थंगवेल सांगतात.