नागपूर : मध्य प्रदेशातून कामाच्या शोधात आलेल्या एका महिलेवर पहिल्यांदा मावस सासऱ्याने व त्यानंतर पतीच्या दोन मित्रांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. नराधमांच्या तावडीतून आपली सुटका करून या महिलेने माहेर गाठले. मध्य प्रदेशातील शिवनी येथे तक्रार दिली. परंतु घटनास्थळ कोराडी असल्यामुळे हे प्रकरण कोराडी पोलिसांकडे पाठविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
शिवनी, मध्य प्रदेशमधील चीलाचौंध ता. लखनादौन या गावातील एक महिला आपल्या पतीसह २ डिसेंबर २०२१ ला कळमेश्वर येथे बांधकाम मजुरीचे काम करायला आली. तिला कळमेश्वर येथे एका झोपडीत तिच्या मावस सासऱ्याकडे राहायला सांगितले. पती वर्धा येथे काम करायचा. ६ डिसेंबर २०२१ ला या महिलेचा मावस सासरा कृष्णा देहरिया (४०) याने सदर महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. पती परतल्यानंतर तिने ही घटना पतीला सांगितली. परंतु याबाबतवाच्यता न करण्याची धमकी पतीने दिली.
महिलेवर अत्याचार होत असल्याची बाब तिच्या ठेकेदाराला कळली. त्याने या महिलेची सुटका करीत तिला १६ डिसेंबर २०२१ रोजी कोराडीला पाठविले. कोराडीत तायवाडे कॉलेज परिसरात एका झोपडीत ती राहून बांधकाम मजूर म्हणून काम करीत होती. १८ डिसेंबरला रात्री ९ वाजता तिचा पती तेथे पोहोचला. महिलेने सांगितलेल्या आपबितीनुसार तिचा पती रामफल डहरिया याने बाजूच्या झोपडीत मित्रासह दारू घेतली. त्यानंतर त्याने तिला झोपडीत बोलावले. तेथे त्याचा मित्र अजय व प्रदीप होते. अजय व तिच्या पतीने बाहेरुन झोपडीचे दार लावले. आत पत्नी व प्रदीप नावाचा मित्र होता. त्याने या महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर प्रदीप बाहेर आला आणि अजयने तिच्यावर बलात्कार केला. बाहेर तिचा पती देखरेख करीत होता. अजय आणि प्रदीपने आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर अजय व प्रदीपने बलात्कार केला.
त्यांच्या तावडीतून आपली सुटका करून या महिलेने ६ मार्चला माहेर गाठून बहिणीला ही घटना सांगितली. त्यानंतर त्यांनी शिवनी पोलिसात तक्रार दाखल केली. घटनास्थळ कोराडी असल्यामुळे शिवनी पोलिसांनी तिला कोराडीत पाठविले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अजय (२८), प्रदीप (३२), कृष्णा डेहरिया (४०) आणि पती रामफल (३०) यांना अटक केली आहे. तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील करीत आहेत.
.............