वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गंजीपेठ फायर स्टेशन जीर्ण झाले असून, ते केव्हाही कोसळण्याची स्थिती आहे. असे असताना या फायर स्टेशनला अद्याप धोकादायक घोषित करण्यात आले नाही. इतरांच्या जीर्ण इमारतींवर कारवाई करणारी महापालिका स्वत:च्याच इमारतीबाबत उदासीन आहे.हे शहरातील पहिले फायर स्टेशन आहे. हे फायर स्टेशन ९० वर्षे जुने आहे. त्याचे अद्याप स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले नाही. १९२७ मध्ये या फायर स्टेशनसोबत कर्मचाऱ्यांसाठी २५ क्वॉर्टरही बांधण्यात आले होते. आता येथील सर्वच बांधकामांचे प्लास्टर उखडत आहे. ठिकठिकाणी सळाखी बाहेर आल्या आहेत. सळाखी जंगल्या आहेत. अशी अवस्था असताना मनपाने या बांधकामांना धोकादायक घोषित केले नाही.सूत्रानुसार, येथील बांधकामाची दुरुस्ती व पुनर्विकासाकरिता गांधीबाग झोनच्या उपअभियंत्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यावर कार्यवाही झाली नाही. काही दिवसांपूर्वी अजनी रेल्वे कॉलनी येथील एका क्वॉर्टरची बालकनी कोसळली होती. या कॉलनीचे बांधकाम १९७५ मध्ये झाले आहे. या घटनेनंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यामुळे प्रशासनाने बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आश्वासन दिले. गंजीपेठ फायर स्टेशन व कॉलनी यापेक्षा जुनी आहे. परिणामी, मनपा अनुचित घटनेची प्रतीक्षा करीत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पुनर्विकासाकरिता प्रस्ताव तयार१७००.८ वर्गमीटरमध्ये असलेले गंजीपेठ फायर स्टेशन व कॉलनीची दुरवस्था पाहता येथील कोणत्याही बांधकामाची दुरुस्ती केली जाऊ शकत नाही. त्यामुळे पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत कॉलनीत २५ ऐवजी १२ क्वॉर्टर बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यात कर्मचाऱ्यांसाठी १-बीएचके व अधिकाऱ्यांसाठी २-बीएचके क्वॉर्टर राहतील. तसेच, महिला व पुरुष कर्मचाºयांसाठी वेगवेगळे विश्रामगृह, गॅरेज, ३ आॅफिस, स्टोअर रुम प्रस्तावित आहे. तळमाळ्यात पार्किंगची व्यवस्था राहील. हा प्रस्ताव लवकरच गांधीबाग झोनच्या उपअभियंत्यांना पाठविला जाणार आहे.
स्ट्रक्चरल ऑडिट होईलगंजीपेठ फायर स्टेशनचे स्ट्रक्चरल ऑडिट प्रस्तावित आहे. त्यानंतर त्याला धोकादायक घोषित करण्यावर निर्णय घेतला जाईल. याशिवाय नवीन इमारतीचा प्रस्तावही सभेत सादर केला जाईल. त्यानंतर आराखडा तयार करून बांधकाम सुरू केले जाईल.- राजेंद्र उचके, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा.