लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भावाला दोन महिन्यावर कालावधी होत असताना बुधवारी पहिल्यांदाच पाच महिन्याच्या चिमुकल्याला कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले. या रुग्णासह सहा नव्या रुग्णांची भर पडली. नागपुरात एकूण रुग्णांची संख्या ३८० झाली असून, यात सात रुग्णांचा मृत्यू तर २९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सध्याच्या स्थितीत ८२ रुग्ण मेयो, मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत. कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. यात लहान मुलांचीही संख्या वाढत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. सध्याच्या स्थितीत नागपुरात १५ वर्षांखालील ५१ मुले कोरोनाबाधित आहेत. यात शून्य ते एक वर्षापर्यंतचे तीन, एक ते पाच वर्षांपर्यंतची आठ तर सहा ते १५ वर्षांपर्यंतचे ४० रुग्ण आहेत. बुधवारी मेयोच्या प्रयोगशाळेतून सहा रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. यात पाच गोळीबार चौकातील तर एक गड्डीगोदाम येथील आहेत. हे सर्व रुग्ण सिम्बॉयसीस येथे क्वारंटार्ईन होते. मेयोमधील कोविड हॉस्पिटल रुग्णसेवेत सुरू झाले असलेतरी रुग्णांना सामान्य वॉर्डातच ठेवण्यात आले होते. आज ४०वर रुग्ण कोविड हॉस्पिटलमध्ये स्थानांतरित करण्यात आले. या हॉस्पिटलमध्ये ६०० खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
पहिल्यांदाच पाच महिन्याचा चिमुकला कोरोनाबाधित; उपराजधानीत रुग्णांची संख्या ३८०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 9:17 AM