विभागीय आयुक्त अनुप कुमार : योग्य समन्वय ठेवण्याच्या सूचना लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या सुविधांसाठी हज समितीचे सदस्य, स्वयंसेवक, पोलीस, प्रशासन, एअर इंडिया, मनपा, नासुप्र यांनी सातत्याने संपर्क ठेवून योग्य समन्वय राहील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना समन्वय समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सर्व संबंधितांना दिल्या.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ‘हज यात्रा-२०१७’च्या पूर्वतयारीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी हज समितीचे अध्यक्ष इब्राहिम शेख, सदस्य उस्नाबानू खलिते, सुलतान शेख, कार्यकारी अधिकारी इंतियाज काझी, नागपूर हज हाऊसचे मोहम्मद कलाम, नासुप्रचे आयुक्त दीपक म्हैसेकर, मनपाचे आयुक्त अश्विन मुद्गल, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, एअर इंडियाचे केंद्रीय व्यवस्थापक एलिस जो पॉल, एअर इंडियाच्या हज समन्वयक सुनीता अॅनी जॉन प्रामुख्याने उपस्थित होते.हजसाठी पहिल्या टप्प्यात नागपूर विमानतळावरून १० ते १२ आॅगस्ट यादरम्यान हज यात्रींना घेऊन विमान रवाना होतील. दुसऱ्या टप्प्यात हजवरून २३ ते २६ सप्टेंबर या कालावधीत यात्रेकरू परततील. हज यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मर्यादित असावी, त्यांनी मर्यादित वाहने घेऊनच नागपुरात यावे, त्यामुळे यात्रेकरूंच्या वाहनांच्या पार्किंगचा तसेच वाहतुकीचा प्रश्न उभा राहणार नाही, असे बैठकीत सांगण्यात आले. विमानतळ परिसरात नियमानुसार यात्रेकरूंना प्रवेश दिला जाईल. इतरांना दिल्या जाणाऱ्या सुरक्षा पासची संख्या मर्यादित असेल. विमान उड्डाणापूर्वीच सुरक्षा तपासणी आणि अन्य बाबींची पूर्तता करण्यासाठी लागणारा एकूण वेळ लक्षात घेता यात्रेकरूंनी त्यांच्या वेळापत्रकाचे काटेकोर नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.यंत्रणा सज्ज ठेवा हज हाऊस येथे नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा. यात्रेकरूंच्या मदतीसाठी स्वयंसेवकांची संख्या वाढविण्यात यावी. तेथील ४२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करून ते सुव्यवस्थित करण्यात यावेत, विदेशी चलनाकरिता एजन्सीचा कक्ष स्थापित करावा, हज हाऊस येथे महानगरपालिका व इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने लसीकरण बूथ ठेवावा. यात्रेकरूंची पूर्ण आरोग्य तपासणी करूनच त्यांना प्रवासासाठी प्रमाणपत्र देण्यात यावे. रुग्णवाहिका आणि अग्निशमन यंत्रणा हज यात्रेच्या कालावधीमध्ये तैनात राहावी, असे निर्देशही यावेळी विभागीय अयुक्त अनुप कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
हज यात्रेसाठी पहिल्या विमानाचे उड्डाण १० आॅगस्टला
By admin | Published: July 11, 2017 1:33 AM