लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाच लोकांच्या खुनाचे साक्षीदार बनलेले आराधनानगर येथील नागरिक घटनेच्या तीन दिवसानंतरही मानसिक धक्क्यातून बाहेर येऊ शकलेले नाही. परिसरात ठिकठिकाणी लोकांचे समूह या निर्घृण खुनाची चर्चा करताना आढळून येतात. कमलाकर पवनकर आणि त्याच्या कुटुंबीयाशी जुळलेल्या प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे आहे की, विवेक तुरुंगातून सुटून बाहेर आला तेव्हापासूनच तो अधिक क्रू र व नराधम असल्याचा संशय आला होता. त्यांनी कमलाकर यांना त्याचवेळी सतर्क करीत त्याला घरात प्रवेश न देण्याचा सल्लाही दिला होता. परंतु कमलाकर यांनी त्यांचे काहीही ऐकले नाही. परिणामी कमलाकर यांना स्वत:सह आई मीराबाई, पत्नी अर्चना, मुलगी वेदांती आणि भाचा गणेश ऊर्फ कृष्णाला जीव गमवावा लागला.एक वर्षापूर्वी तुरुंगातून सुटून आल्यानंतर विवेक तीन महिने कमलाकर यांच्या घरीच राहिला होता. सूत्रानुसार त्याचवेळी त्याचा कमलाकर व बहीण अर्चनासोबत वाद होऊ लागला. बेरोजगार असल्याने तो कमलाकर यांच्या घरीच पडून असायचा. इलेक्ट्रीक उपकरण दुरुस्तीचे दुकान घरीच असल्याने कमलाकरही घरीच असायचा. कमलाकर हा भाजपाचा कार्यकर्ता होता. तसेच जैन कलार समाजाशीही तो जुळलेला होता. त्यामुळे त्याच्या घरी लोकांचे येणे-जाणे असायचे. विवेकची संदिग्ध प्रवृत्ती पाहून लोकही विचारायचे. विवेकबाबत पूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर ते सुद्धा विवेकला घरी आश्रय न देण्याचा सल्ला द्यायचे.परिसरातील काही महिलांनी तर विवेकला पहिल्याच नजरेत ओळखून घेतले होते. त्यांना विवेकची नजर इतकी वाईट की तो असताना महिलांनी कमलाकर यांच्या घरीही जाणे सोडले होते. त्यांनी कमलाकर यांनाही याबाबत सांगितले होते.नागरिकांचे म्हणणे आहे की, कमलाकर यांनी एकदाही असा विचार केला नाही की, विवेक स्वत:च्या घरच्यांचा होऊ शकला नाही, तो त्यांच्याप्रति कशी सहानुभूती ठेवेल. या हत्याकांडानंतर विवेकबद्दल नवनवीन माहिती समोर येत आहे. विवेकच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. असे सांगितले जाते की, त्याच्या वडिलांनी दोन लग्न केले होते. पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुली आहेत. तर दुसऱ्या पत्नीची मुलं विवेक आणि कमलाकरची पत्नी अर्चना आहे.पहिल्या नजरेतच महिलांनी ओळखला होता विवेकमधला नराधमविवेकची आई मौद्यात नातेवाईकाच्या मदतीने राहते. पत्नीला त्रास देत असतानाच विवेक आईलाही त्रास द्यायचा. त्याने आपल्या आईलाही अनेकदा मारहाण केली होती. त्याच्या भीतीमुळेच आईने नातेवाईकाकडे आश्रय घेतला होता. सावत्र बहिणींनीसुद्धा विवेकशी कुठलेही नाते ठेवले नव्हते. बहीण अर्चना आणि जावई कमलाकर यांच्याशिवाय कुणीही विवेकला आपल्यावळ येऊ देत नव्हते.कुठे आहे ‘हायटेक’ पोलीसतीन दिवस लोटले आहे, परंतु विवेक पालटकरचा पत्ता लावण्यास पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे नागपूरच्या हायटेक पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांना आतापर्यंत विवेकचा कुठलाही पत्ता लागलेला नाही. शहरात सीसीटीव्हीचे जाळे पसरलेले आहे. याच्या भरवशावर कुठल्याही गुन्हेगाराला काही तासातच पकडण्याचा दावा पोलिसांनी केला होता. परंतु घटनेनंतर विवेक कसा पळाला, याचा शोधही पोलीस लावू शकलेले नाही. नंदनवन ठाणे आणि गुन्हे शाखेसह सर्व ठाण्यातील पोलीस विवेकला शोधत आहेत.आता मुलीला मिळत आहे शिक्षावडिलांनी केलेल्या कृत्याची शिक्षा नऊ वर्षांची चिमुकली वैष्णवीला भोगावी लागत आहे. हत्याकांडानंतर पवनकर परिवार तुटले आहे. विवेक तीन दिवसानंतरही फरार असल्याने त्याच्याकडून पवनकर कुटुंबाला अजूनही जीवाची भीती वाटत आहे. त्यामुळे नऊ वर्षांच्या वैष्णवीला आपल्याजवळ ठेवणे सर्वांना धोक्याचे वाटत आहे. कमलाकरचे नातेवाईक बुधवारी सायंकाळी वैष्णवीला घेऊन नंदनवन पोलीस ठाण्यात गेले होते. त्यांनी वैष्णवीला आपल्याजवळ ठेवण्यास नकार देत पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस वैष्णवीला गुरुवारी अनाथालयाकडे सोपविणार आहे. वडिलाने केलेल्या कृत्याची शिक्षा वैष्णवीला भोगावी लागत आहे. वैष्णवीने चार वर्षांपूर्वी आईला गमावले. ताज्या घटनेत भावाला गमावले. विवेकने आपला चार वर्षाचा मुलगा गणेश ऊर्फ कृष्णाचीही हत्या केली. भावाच्या मृत्यूच्या धक्क्यासह तिला वडिलाच्या कृत्याची शिक्षाही भोगावी लागत आहे. घटनेनंतर आराधनानगरातील नागरिक वैष्णवी आणि कमलाकरची मुलगी मिताली यांच्याबाबत चिंतित आहेत. मितालीची जबाबदारी आत्याने घेतली आहे. परंतु वैष्णवीच्या मदतीसाठी कुणीही समोर आलेला नाही.