लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचा नमुना साधारण १४ दिवसानंतर निगेटिव्ह येतो. त्यानंतर त्यालारुग्णालयातून सुटी दिली जाते. परंतु खामला येथील १६ वर्षीय युवतीचा नमुना तब्बल ३९ दिवसानंतर निगेटिव्ह आला. मध्य भारतातील हे पहिले प्रकरण असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, या युवतीच्या वडिलांचा नमुना निगेटिव्ह आला असताना ते मुलीसाठी रुग्णालयात थांबून होते. खामला येथील हे दोन्ही रुग्ण आज कोरोनामुक्त झाल्याने खामला व जरीपटका येथील साखळी खंडित झाली आहे. या रुग्णासह मेयोतून शहडोल मध्य प्रदेश रहिवासी असलेला एक तर मेडिकलमधून दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले. नागपुरात आज केवळ एका रुग्णाची नोंद झाल्याने आजचा दिवस आरोग्य यंत्रणेसाठी दिलासादायक ठरला. खामला येथील पॉझिटिव्ह रुग्णाकडे व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या ४७ वर्षीय पुरुषाला २६ मार्च रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. २७ मार्च रोजी या व्यवस्थापकाच्या १६ वर्षीय मुलीचा नमुना पॉझिटिव्ह आला. यामुळे या दोघांना मेयोत दाखल केले. १४ दिवसानंतर म्हणजे १० एप्रिल रोजी युवतीच्या वडिलांचे नमुने निगेटिव्ह आले. परंतु मुलीचा नमुना पॉझिटिव्ह आल्याने ते मुलीसोबत रुग्णालयातच थांबले. दर पाच ते सात दिवसाच्या अंतराने मुलीचा नमुना तपासला जात होता. प्रत्येक वेळी नमुना पॉझिटिव्ह येत होता. परंतु डॉक्टरांच्या योग्य औषधोपचारामुळे ४ मे रोजी पहिल्यांदा युवतीचा नमुना निगेटिव्ह आला. २४ तासानंतर पुन्हा नमुना तपासला असता तोही निगेटिव्ह आला. आज या कोरोनामुक्त बापलेकीला मेयोमधून सुटी देण्यात आली. २१ एप्रिल रोजी शहाडोल मध्य प्रदेशातील ५७ वर्षीय पुरुषाचा नमुना पॉझिटिव्ह आला होता. या रुग्णाला मोमीनपुरा येथून क्वारंटाईन करण्यात आले होते. आज त्याचाही नमुना निगेटिव्ह आल्याने सुटी देण्यात आली. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी या रुग्णाला घरी सोडण्यासाठी विशेष सहकार्य केले, अशी माहिती उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी दिली.
तीन दिवसाच्या बाळासह पती, पत्नीने केली कोरोनावर मातसतरंजीपुरा येथील २३ वर्षीय गर्भवतीसह ३३ वर्षीय तिच्या पतीचा नमुना पॉझिटिव्ह आल्याने दोघांना मेडिकलमध्ये भरती केले. तीन दिवसांपूर्वी तिने कोविड हॉस्पिटलमध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला. प्रसुतीपूर्वी तिचे आणि तिचा पतीचा नमुना निगेटिव्ह आला. २४ तासाच्या अंतराने बाळाचे नमुने तपासले असता निगेटिव्ह आल्याने या तिघांना आज रुग्णालाातून सुटी देण्यात आली. आज पाच रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने नागपुरात बरे झालेल्यांची संख्या ६१ झाली आहे.
सतरंजीपुऱ्यातील आणखी एक महिला पॉझिटिव्हसतरंजीपुऱ्यातील ४४ वर्षीय एका महिलेचा नमुना पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या १६१ झाली आहे. विशेष म्हणजे, या महिलेचा पहिला नमुना निगेटिव्ह होता तर तिच्या ११ वर्षीय मुलीच नमुना पॉझिटिव्ह आला. यामुळे तिच्यासोबत ती रुग्णालयात थांबली होती. सोमवारी या मुलीचा नमुना निगेटिव्ह आला असताना तिच्या आईचा नमुना पॉझिटिव्ह आला. यामुळे आईला मेयोमध्ये भरती करून मुलीला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
खामला, जरीपटक्यातील साखळी खंडितमेयोचे उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे म्हणाले, २६ मार्च रोजी दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या खामल्यातील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. या रुग्णापासून १० जणांना लागण झाली. यात जरीपटक्यातील तिघे होते. १४ दिवसाच्या उपचाराने यातील आठ रुग्ण बरे होऊन घरी गेले. परंतु खामल्यातील १६ वर्षीय युवतीचा नमुना पॉझिटिव्ह आल्याने तिला रुग्णालयात थांबावे लागले. तिच्यासाठी तिचे वडील निगेटिव्ह येऊनही रुग्णालयात थांबून होते. आज त्या युवतीचा नमुना निगेटिव्ह येताच खामला व जरीपटक्यातील साखळी खंडित झाली.
आणखी एका संशयितेची प्रसुतीनऊ महिने पूर्ण झालेली रेड झोन वसाहतीतील एका कोरोना संशयित गर्भवतीवर आज तातडीने सिझर करून प्रसुती करण्याची वेळ आली. मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये ही प्रसुती झाली. डॉक्टरांनी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत ही प्रसुती केली. विशेष म्हणजे, सोमवारी अशाच दोन संशयित महिलेची प्रसुती करण्यात आली. यातील एका महिलेचा नमुना निगेटिव्ह आला असून आज प्रसुती झालेल्या महिलेचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
आता सफाई कर्मचारी राहणार हॉटेलमध्येमेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये सेवा देणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या कुटुंबाला बाधा पोहचू नये म्हणून १४ दिवसापर्यंत त्यांची रामदासपेठ येथील एका खासगी हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. या मागणीला घेऊन गेल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते.
कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित २३७
दैनिक तपासणी नमुने ३९
दैनिक निगेटिव्ह नमुने ३८
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने १६१
नागपुरातील मृत्यू ०२
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ६१
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १५३३
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १९९३
-पीडित-१६१-दुरुस्त-६१-मृत्यू-२