लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ५० वर्षांअगोदर प्रकाशित झालेल्या ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीच्या पहिल्या अंकाला ‘डिजिटल’ स्वरूप देण्यात आले आहे. या अंकाच्या मुखपृष्ठाच्या प्रतिकृतीचे ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते विमोचन झाले. ‘लोकमत’ नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हा आगळावेगळा पुढाकार घेण्यात आला.
‘लोकमत’ नागपूरचा पहिला अंक १५ डिसेंबर १९७१ रोजी प्रकाशित झाला होता. या अंकाला अथक प्रयत्नांनंतर ‘डिजिटल’ स्वरूप देण्यात आले व त्याचे मुखपृष्ठ तसेच अंतिम पृष्ठाची प्रतिकृती तयार करण्यात आली. ‘लोकमत’च्या बुटीबोरी येथील प्रिंटिंग प्रेसमध्ये या प्रतिकृतीचे विमोचन करण्यात आले. जुन्या आठवणी ‘डिजिटल’ माध्यमातून नवीन पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक झाले आहे. वर्तमानसृष्टीसाठीदेखील हा नवा प्रयोग असून, भविष्याच्या दृष्टीने नवीन पायंडा ठरणार आहे, अशी भावना विजय दर्डा यांनी व्यक्त केली. यावेळी ‘लोकमत’चे संचालक (परिचालन) अशोक जैन, ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, ‘लोकमत समाचार’चे संपादक विकास मिश्र, ‘लोकमत समाचार’चे सहायक उपाध्यक्ष मतीन खान, ‘लोकमत’चे माजी संपादक दिलीप तिखिले, वरिष्ठ महाव्यवस्थापक (प्रोडक्शन) राजेंद्र पिल्लेवार, महाव्यवस्थापक (वितरण) संतोष चिपडा प्रामुख्याने उपस्थित होते. पहिल्या अंकाला ‘डिजिटल’ स्वरूप देण्यासाठी सहकार्य करणारे रेनॉल्ड मॉरीस, किशोर सोलव, चित्तरंजन नागदेवते यांना सन्मानित करण्यात आले. सुनिल कोंगे यांनी संचालन केले.