उमरेड : बुधवारी पेठ येथील ‘अरुणोदय-२’, विमल कॉम्प्लेक्समध्ये गुरुवारी झालेली लुटमार आधी रेकी आणि मग जबरी चोरी असण्याची दाट संभावना पोलीस तपासात व्यक्त होत आहे. कॉम्प्लेक्ससमोरील घरी लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत दोन्ही लुटारू कैद झाले आहेत. विमल अरुण गिरडकर या घरी एकट्या असताना रात्री ७.३० वाजताच्या सुमारास बंदुकीचा धाक दाखवित दोन लुटारुंनी दीड तोळ्याचे मंगळसूत्र, दोन तोळ्यांचा सोन्याचा गोफ आणि नगदी तीन हजार रुपये असा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून उमरेड पोलिसांची चमू विविध स्तरावर तपास करीत आहेत.
सदर घटनेचा उमरेड पोलीस ठाण्यात ३९२, ४५२, ३४ भादवी, सहकलम ३/२५ आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत श्वानपथकाच्या माध्यमातूनही तपासाचे चक्र फिरविण्यात आले. फिंगर प्रिंट विशेषज्ञांना पाचारण करण्यात आले होते. लुटारूंनी बंदूक पिशवीत आणली होती. ‘काका आहेत का’ असा प्रश्न विमल गिरडकर यांना करीत लुटारूंनी घरात प्रवेश केला. गिरडकर सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घराबाहेर पडतात आणि ८ ते ९ वाजता घरी परततात, असा दिनक्रमही लुटारूंना माहिती असावा, अशीही बाब बोलली जात आहे. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.
कॉम्प्लेक्समध्ये सीसीटीव्ही नाहीत
साधारणत: पाच वर्षापूर्वी बांधकाम पूर्णत्वास आलेल्या आणि निवासव्यवस्थेसाठी सज्ज झालेल्या या कॉम्प्लेक्समध्ये एकूण ८ सदनिका आणि दोन डुप्लेक्स आहेत. कॉम्प्लेक्स उभारले खरे परंतु याठिकाणी एकही सीसीटीव्ही अद्याप लावण्यात आले नाही, यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत अरुण गिरडकर यांच्याशी चर्चा केली असता लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या तयारीत होतो. तब्येतीमुळे शक्य झाले नाही, असे त्यांनी सांगितले.
घटनाक्रम १० मिनिटांचा
कॉम्प्लेक्समध्ये सीसीटीव्ही नसले तरी या कॉम्प्लेक्ससमोर निवासी असलेले निशांत ताजणे यांच्याकडील सीसीटीव्हीत दोन लुटारू येताना-जाताना दृष्टिक्षेपात येत आहेत. गुरुवारी रात्री ७ वाजून २४ मिनिटांनी दोघे कॉम्पलेक्समध्ये प्रवेश करीत असून केवळ दहा मिनिटातच रात्री ७ वाजून ३३ मिनिटांनी पहिला लुटारू तर लगेच दोन मिनिटात दुसरा लुटारू बाहेर पडत असतानाचे चित्रण या सीसीटीव्हीत कैद झाले आहे. दोघांनीही रुमालाने तोंड बांधले होते. रात्रीची वेळ असल्याने आणि रुमालाने तोंड बांधून असल्याने चेहरे मात्र अस्पष्ट दिसून येत आहेत. अतिशय सावकाशपणे कॉम्पलेक्समधून बाहेर पडत असल्याचीही बाब लक्षात येत आहे. दोघेही कॉम्पलेक्सलगतच्या जुन्या पोस्ट ऑफीसच्या दिशेने पायीच गेल्याचेही दिसून येत आहे. ते नेमके कशाने आले होते याचा शोध घेतला जात आहे.