लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीच्या अवयवदान चळवळीसाठी रविवारचा दिवस महत्त्वाचा ठरला. शहरात पहिल्यांदाच एका खासगी रुग्णालयात यकृत प्रत्यरोपण झाले, तर त्याचवेळी दोन वेगवेगळ्या रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले. अमरावती येथील मेंदू मृत (ब्रेन डेड) २४ वर्षीय तरुणीने केलेल्या अवयवदानामुळे हे शक्य होऊ शकले.अवयवदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागले आहे. विशेषत: नातेवाईक असह्य दु:खात बुडाले असताना स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला जात आहे. त्यांच्या या संयम आणि मानवतावादी भूमिकेमुळे नागपुरात अवयवदानाचा आकडा वाढत आहे.रविवार २२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता वाहतूक पोलीस शाखेच्या मदतीने ग्रीन कॉरीडॉर करून एक नव्हे तर तब्बल तीन रुग्णालयांमध्ये वेळेत अवयव पोहचविण्यात आले. झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटरच्या (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी व सचिव डॉ. रवी वानखेडे यांच्या विशेष प्रयत्नामुळे हे शक्य होऊ शकले. दोन मूत्रपिंड आणि यकृतसाठी अमरावती ते नागपूर असे ग्रीन कॉरीडॉर करण्यात आले होते. वाडी पोलिसांच्या मदतीने तीन वेगवेगळ्या रुग्णवाहिकेतून हे अवयव राष्टष्ट्रसंत तुकडोजी विद्यापीठ कॅम्पस चौकात आल्यानंतर यकृत असलेली रुग्णवाहिका पुढील प्रवासासाठी वाहतूक शाखा नं. २ चे सहायक पोलीस निरीक्षक अजय लिंगुरकर यांच्या हवाली करण्यात आली. चालक पोलीस कर्मचारी अशोक एपुरे यांनी ताशी ९० ते १०० किलोमीटर वेगाने वाहन चालवून रुग्णवाहिकेला जागा मोकळी करून दिली. त्यांच्या मदतीला कॉन्स्टेबल धीरज देशमुख होते. यामुळे कॅम्पस चौक ते लकडगंज येथील न्यू ईरा हॉस्पिटल हे १० किलोमीटरचे अंतर केवळ १० मिनिटांत कापणे शक्य झाले. यासाठी चौकाचौकातील वाहतूक पोलीस, पोलीस कर्मचारी यांचीही मोठी मदत मिळाली. तर सहायक पोलीस निरीक्षक मुस्तफा खान यांनीही कमीतकमी वेळात शंकरनगर वोक्हार्ट हॉस्पिटल व खामला येथील आॅरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये मूत्रपिंड असलेली रुग्णवाहिका पोहचवली.सहा वर्षानंतर यकृत प्रत्यारोपण‘ह्युमन आॅर्गन ट्रान्सप्लांट’ कायदा १९९४ नुसार १३ सप्टेंबर २०१२ रोजी नव्या नियमांचा अध्यादेश जारी करण्यात आला. त्यानुसार नागपुरात पहिल्यांदाच ‘झेडटीसीसी’च्या कार्याला सुरूवात झाली. आतापर्यंत २९ ब्रेन डेड रुग्णांकडून अवयव दान करण्यात आले. नागपुरातील शासकीय व चार खासगी रुग्णालयांना केवळ मूत्रपिंड प्रत्यारोपणाची मंजुरी होती. यामुळे १५ यकृत नागपूर बाहेर पाठविण्यात आले. यावर्षी पहिल्यांदा तीन खासगी रुग्णालयांना यकृत प्रत्यारोपणाची मंजुरी मिळाली. परिणामी, लकडगंज येथील न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये प्रथमच रविवारी यकृत प्रत्यारोपण होऊ शकले. सुत्रानूसार रात्री ७.३० वाजता प्रत्यारोपणाला सुरूवात झाली पहाटे ५ वाजेपर्यंत शस्त्रक्रिया सुरू होती.
दोन मूत्रपिंडाचेही प्रत्यारोपणरविवारी एकाचवेळी नागपुरातील तीन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांना अमरावती येथील ब्रेन डेड रुग्णांकडून दोन मूत्रपिंड व यकृत मिळाले. नागपुरच्या वैद्यकीय क्षेत्रात हे प्रथमच घडले. खामला येथील आॅरेंज सिटी हॉस्पिटलला एक मूत्रपिंड तर दुसरे मूत्रपिंड शंकरनगर येथील वोक्हार्ट हॉस्पिटलला देण्यात आले. रविवारी रात्रीच या दोन्ही मूत्रपिंडाचे प्रत्यारोपणही झाले. तर यकृत लकडगंज येथील न्यू ईरा हॉस्पिटलला मिळाले.