नागपूर : आंबेडकरी विचार मांडणारे अनेक जण समाजात व देशात आहेत. परंतु जागतिक पातळीवरील शोषित वंचितांच्या प्रश्नांकडे पाहणारे फार कमी आहेत. जागतिक प्रश्नाकडे आंबेडकरी विचाराने पाहणारा, व्यक्त करणारा आणि त्याची ग्लोबल व्याख्या करणारा कवी म्हणजे केतन पिंपळापुरे होय. त्यामुळेच तो खऱ्या अर्थाने युगकवी ठरतो. मार्शल केतन पिंपळापुरे हे सर्वप्रथन हाडाचे आंबेडकरी कार्यकर्ते होते. समता सैनिक दलासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. कार्यकर्ता म्हणूनच ते अखेरपर्यंत जगले. प्रचंड प्रतिभेचे धनी असलेले केतन पिंपळापुरे यांचे व्यक्तिमत्त्व विविधांगी होते. ते उतच्तम कवी, मूर्तिकार, चित्रकार, पत्रकार, लेखक, गीतकार होते. त्यांची प्रत्येक कलाकृती (कवितासंग्रह) ही जागतिक संदर्भाने विचार करायला लावणारी होती. तरीही ती आंबेडकरी चळवळीच्या मुळाशी घट्ट जुळलेली होती. मार्शल रेस, डेमोफून, मकाबी, हेमलॉक आणि नोबल ट्रुथ यासारख्या एकापेक्षा एक कृती त्यांनी निर्माण केल्या. केवळ क्षितिजावर उभे राहून आंबेडकरी शक्तीचे व वेदनांचे विश्लेषण करीत न बसता स्वत:ला चळवळीमध्ये झोकून देऊन ते आंबेडकरी चळवळीतील आव्हानांना साद घालत होते. म्हणून एक संवेदनशील कार्यकर्ता असा त्यांचा लौकिक होता. त्यामुळेच त्यांच्या विषयी असे म्हटले जाते की, ‘सूर्यकंकण’ हाती बांधून हा ‘मार्शल रेस’ ज्याचा जन्म ‘डेमाफून’ म्हणून झाला. तो ‘डेमोफून’ ‘मकाबी’चं बोटं धरून जेव्हा निघाला तेव्हा त्याला ‘हेमलॉक’चे विषाचे प्याले प्यावे लागले. तरीही ‘नोबल ट्रूथ’ मिळवून त्याने त्याची लढाई पूर्ण केली. (प्रतिनिधी)