लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात तयार करण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीच्या पहिला टप्प्याची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू झाली आहे. मानवी चाचणीत सहभागी झालेल्या ५५ व्यक्तींच्या रक्ताचे नमुने तपासले जाणार आहे. त्यानंतर ४२ व्या दिवशी रक्ताचे नमुने तपासून लसीच्या प्रभावाचा निष्कर्ष काढला जाईल. तूर्तास लस देण्यात आलेल्यांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.भारत बायोटेक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) व इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या तीन संस्थांच्या देखरेखीत कोव्हॅक्सिन लसीची मानवी चाचणीला सुरुवात झाली. यात नागपूरच्या गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा समावेश आहे. या हॉस्पिटलमध्ये २८ ते ३१ जुलै या कालावधीत ५५ व्यक्तींना पहिला डोज देण्यात आला.
सर्वाधिक व्यक्तींना डोज देणारे हे देशातील दुसरे हॉस्पिटल ठरले. पहिला डोज ‘.५ ’ मिलीमध्ये ‘. ३’ मायक्रोग्रॅम’ औषधांचा होता. त्यानंतर दुसरा डोज ११ ते १४ ऑगस्टदरम्यान देण्यात आला. हा ‘.५ मिली’मध्येच ‘. ६ मायक्रोग्रॅम’ औषधांचा होता. या १४ दिवसात कुणालाही आरोग्याची समस्या निर्माण झाली नसल्याचे हॉस्पिटलचे संचालक डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ते म्हणाले, चाचण्याच्या पहिल्या टप्प्यात ही लस सुरक्षित असल्याची खात्री पटली आहे. लसीचा दुसरा डोज देण्यात आला. त्यापूर्वी त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले.
आता २८ दिवसानंतर म्हणजे मंगळवारपासून रक्ताचे नमुने घेणे सुरू होईल, त्यानंतर ४२ दिवसानंतर रक्ताचे नमुने घेऊन अंतिम निष्कर्ष काढला जाईल. पहिल्या व दुसऱ्या रक्ताच्या नमुन्यांचा एकत्रित अहवाल येणार आहे. परंतु लसीच्या दोन डोजनंतर कु णालाही लक्षणे दिसून आली नाही. यामुळे ही लस सुरक्षित असल्याचेही डॉ. गिल्लूरकर म्हणाले.