लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : लिहिगाव-महालगाव मार्गालगत बांधण्यात आलेली नाली निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना ठरली आहे. कारण, येथील नाली पहिल्याच पावसात खचली असून, या नालीच्या बांधकामाची गुणनियंत्रण विभागाकडून निरपेक्ष चाैकशी करण्यात यावी तसेच कंत्राटदारासह इतर दाेषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आलेल्या तक्रारीत केली आहे.
यासंदर्भात सरपंच गणेश झोड यांनी सांगितले की, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कामठी तालुक्यातील लिहिगाव-महालगाव मार्गालगत दाेन्ही बाजूंनी सार्वजनिक बांधकाम विभागाने सिमेंट काँक्रिट नालींचे बांधकाम केले. या कामासाठी खनिकर्म विभागामार्फत ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला हाेता. शिवाय, ही कामे कंत्राटदारामार्फत करण्यात आली. कंत्राटदाराने या कामाला चार महिन्यापूर्वी सुरुवात केली हाेती. या नालीचे बांधकाम निकृष्ट प्रतीचे करण्यात येत असल्याचे लक्षात येताच आपण कंत्राटदाराला समजावून सांगत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शेख यांनाही माहिती दिली हाेती, असे गणेश झाेड यांनी सांगितले.
दाेन दिवसापूर्वी काेसळलेल्या पहिल्याच पावसात लिहिगाव येथील विष्णू निकाळजे व कृष्णा हिवसे यांच्या घराजवळ ही नाली खचली आहे. या नालीवर मागणी करूनही स्लॅब टाकण्यात न आल्याने नागरिकांना घरी जाण्यास अडचणी येत आहेत. निकृष्ट बांधकामामुळे ही नाली खचल्याने या कामाचे गुणनियंत्रण विभागामार्फत निरपेक्ष चाैकशी करण्यात यावी, कंत्राटदारासह दाेषींवर कारवाई करावी तसेच या नालीने नव्याने दर्जेदार बांधकाम करावे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शेख यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. शिष्टमंडळात सरपंच गणेश झाेड, उपसरपंच सुनीता ठाकरे, रवींद्र निकाळजे, सुषमा ठाकरे, हरीश निकाळजे, नरेश घरडे, विनोद ढोके, घनश्याम निकाळजे, नीलेश बोरकर, पृथ्वीराज बोरकर यांच्यासह गावकऱ्यांनी समावेश हाेता.
===Photopath===
140621\img-20210613-wa0107.jpg
===Caption===
सिमेंट काँक्रीट ची खचलेली नाली दाखवताना गावकरी