लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरकरांना कोरोना महामारीत सगळ्यात जास्त उणीव जाणवली ती ऑक्सिजनची. याच ऑक्सिजन निर्मितीच्या स्वयंपूर्णतेकडे जाण्यासाठी ऊर्जा विभागाच्या महानिर्मिती कंपनीने पुढाकार घेत कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारला. ग्रामीण भागातील हा पहिला ऑक्सिजन प्लांट असून, सोमवारी याचे लोकार्पण करण्यात आले.
महानिर्मितीतर्फे सामाजिक दायित्व निधीतून व पीएसए तंत्रज्ञानावर उभारण्यात आलेला हा प्लांट अवघ्या १८ दिवसात उभारण्यात आला.
औष्णिक विद्युत केंद्रांत निर्माण होणाऱ्या ओझोन वायूचा उपयोग करून रुग्णांसाठी मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करण्यात आली आहे. यातून दररोज ६५ ते ७० रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. या प्लांटमधून ९५ टक्के एवढ्या शुद्धतेचा प्राणवायू उपलब्ध होणार आहे. ३५ घनमीटर क्षमतेचा हा प्लांट आहे. पहिल्या टप्प्यातील ऑक्सिजन प्लांट नागपुरातील पाचपावली भागात सुरू झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील हा प्लांट आहे.
महाजेनकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे, कार्यकारी संचालक अभय हरणे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्लांटची तांत्रिक बाजू मुख्य अभियंता राजू भुगे, उपमुख्य अभियंता शरद भगत, प्रभारी उपमुख्य अभियंता डॉ. अनि काठोये, हेमंत टेंभरे यांनी पार पाडली.
पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते सोमवारी या प्लांटचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी कामठी नगर परिषदेचे अध्यक्ष शहाजहा अन्सारी, उपाध्यक्ष अहफाज अहमद, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार, उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक नयना दुपारे उपस्थित होते.