सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोना विषाणूचा सर्वाधिक फैलावाचा धोका नाकातूनच होतो. यामुळे नाकातच कोरोनावर उपचार करून त्याचे इन्फेक्शन रोखण्यासाठी मेडिकलला मानवी चाचणीसाठी परवानगी मिळाली आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये ही चाचणी होणार असून, कोविड समाप्तीकडे हे पहिले पाऊल असल्याचे बोलले जात आहे. (The first step towards the end of covid!)
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशात लसीकरण सुरू आहे. नुकतेच नाकातून लस (नेझल स्प्रे) देण्यावरची चाचणी सुरू आहे. परंतु कोरोना झाल्यास नाकातच उपचार करण्याची पहिल्यांदाच मानवी चाचणी होऊ घातली आहे. कॅनडा येथील ‘ग्लेनमार्क फार्मास्युटिकल लिमिटेड’ने कोरोनावर ‘नायट्रिक ऑक्सिड नेझल स्प्रे’ तयार केले आहे. कोरोनाच्या लढाईत नाकातच उपचार करण्याची ही पद्धत ‘गेम चेंजर’ ठरण्याची शक्यता आहे. ‘केंद्रीय ड्रग्ज कंट्रोलर जनरल’ने याला मंजुरी दिली असून, देशात जवळपास ६०३ लोकांवर ही चाचणी केली जाणार आहे.
नागपूर मेडिकलमधील औषधवैद्यकशास्त्र (मेडिसीन) विभागात अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्या मार्गदर्शनात, मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील यांच्या सहकार्याने व मेडिसीन विभागाचे प्राध्यापक डॉ. राजेश गोसावी यांच्या मार्गदर्शनात ही चाचणी होणार आहे.
- सौम्य लक्षणे असलेल्याच रुग्णांवर चाचणी
या चाचणीचे प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर डॉ. राजेश गोसावी म्हणाले, कोरोनाच्या विषाणूवर नाकातच उपचार करून रोखण्याची ही औषधी चाचणी आहे. यात ज्यांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी पॉझिटिव्ह येऊन ४८ तासापेक्षा कमी वेळ झाला असेल, ज्यांना केवळ सौम्य लक्षणे असतील आणि ज्यांचे वय १८ ते ६५ च्या आत असेल त्यांच्यावरच ही चाचणी केली जाईल.
- अशी होणार चाचणी
डॉ. गोसावी म्हणाले, ‘स्टॅण्डर्ड केअर’नुसार चाचणीत सहभागी होणाऱ्यांचे दोन गट तयार केले जातील. यातील एका गटामधील रुग्णांना ‘नायट्रिक ऑक्सिड’चा ‘नेझल स्प्रे’ तर दुसऱ्या गटाला ‘प्लॅसेबो’ म्हणजे कुठलेही औषध नसलेले ‘नेझल स्प्रे’ दिले जाईल. रुग्णाला घरी राहूनच पाच दिवस दिवसातून सहावेळा नाकात हा ‘स्प्रे’ करायचा आहे.
- आरटीपीसीआर चाचणीतून व्हायरल लोडची तपासणी
चाचणीत सहभागी झालेल्या रुग्णांची पहिले चार दिवस आणि आठव्या दिवशी ‘आरटीपीसीआर’ चाचणी केली जाईल. यातून त्यांच्यातील ‘व्हायरल लोड’ तपासले जाईल. सोबतच १८ दिवसानंतर दोन्ही ग्रुपमधील रुग्णांचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यात येईल, असेही डॉ. गोसावी म्हणाले.
- चाचणीत सहभागी व्हा
सध्या कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. ही चाचणी केवळ कोरोनाचे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठीच आहे. यामुळे अशा रुग्णांनी मेडिकलच्या मेडिसीन विभागात संपर्क साधावा. ही ‘ड्रग ट्रायल’ कोरोनाचा उपचारात महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.
-डॉ. राजेश गोसावी, मेडिसीन विभाग, मेडिकल