दीपक भातुसे
नागपूर : शासकीय नोकर भरतीच्या परीक्षा शुल्कापोटी शासनाने प्रति विद्यार्थी एक हजार रुपये आकारल्यानंतर आता या भरती परीक्षेतील प्रश्नांवर आक्षेप असेल तर तो नोंदविण्यासाठीही पैसे भरावे लागणार आहेत. यापूर्वी परीक्षा शुल्कापोटी खासगी कंपन्यांनी शेकडो कोटी रुपये जमा केले असताना विद्यार्थ्यांची पुन्हा ही लूट का? असा सवाल विचारण्यात येत आहे.
१३ डिसेंबरपर्यंत मुदत
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या नगर परिषद राज्यसेवा गट - क परीक्षेत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्तराच्या अनुषंगाने उत्तरतालिका (Response Sheet) ३० नोव्हेंबर रोजी उमेदवारांच्या लॉग इन आयडीवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या उत्तरतालिकेबाबत उमेदवारांच्या सूचना किंवा आक्षेप असल्यास ते ऑनलाइन पद्धतीने १३ डिसेंबरपर्यंत नोंदविता येणार आहेत. मात्र, त्यासाठी प्रति प्रश्न शंभर रुपये शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरणा करायचे आहे. नगर परिषद प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी या संदर्भातील प्रसिद्धी पत्रक प्रकाशित केले आहे.
प्रति विद्यार्थी एक हजार रुपये शुल्क आकारल्याने आधीच गरीब विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे. हे शुल्क जास्त असल्याचा मुद्दा यापूर्वी आमदारांनी विधानसभेत उपस्थित केला होता. मात्र, शुल्क कमी करण्याऐवजी सरकारने त्याचे समर्थन केले होते.
एक हजार रुपये शुल्क घेऊनही खासगी कंपन्यांचे पोट भरले नाही का? प्रत्येक प्रश्नाच्या आक्षेपासाठी शंभर रुपये आकारले जात आहेत. चुकीची उत्तरतालिका कंपन्या बनवणार, मग चुका दुरुस्तीची किंमत परीक्षार्थींनी का चुकवावी? ही सरकारमान्य लूटमार चालू आहे.
- महेश घरबुडे, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती