नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) नागपुरात विजयादशमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात एका मुस्लिम व्यक्तीला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित केलं आहे. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एका प्रसिद्ध होमिओपथी डॉक्टरांना मुख्य पाहुणा म्हणून आमंत्रित करत, 92 वर्षात प्रथमच एका मुस्लिम व्यक्तीला हा सन्मान दिला आहे. २७ सप्टेंबर १९२५ रोजी डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. दस-याला म्हणजेच विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपला स्थापनादिवस साजरा करतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बोहरा समाजाचे मुनव्वर युसूफ यांना मुख्य पाहुणे म्हणून आमंत्रित केलं असून, या माध्यमातून मुस्लिमांमध्ये आपलं महत्व वाढवण्याचा प्रयत्न असणार आहे असं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युसूफ आणि त्यांच्या काकांचा सुरुवातीपासूनच आरएसएसशी संबंध राहिला आहे. 1 ऑक्टोबर रोजी आरएसएसने चार वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. प्रत्येक कार्यक्रमात जवळपास 600 मुलं सहभागी होणार आहेत.
देण्यात आलेल्या वृत्तानुसार, याचवर्षी एप्रिल महिन्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी बोहरा समाजाचे नेते सैय्यदाना यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली होती. सैय्यदाना यांनी याआधी नरेंद्र मोदी सरकारच्या मेक इन इंडिया आणि स्वच्छ भारत अभियानाचं कौतुक केलं आहे.
सरसंघचालक दरवर्षी विजयादशमीला स्वयंसेवकांना संबोधित करत असतात. 2014 रोजी केंद्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर प्रसारमाध्यमांनीही आरएसएसच्या दसरा कार्यक्रमाकडे आधीपेक्षा जास्त लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
गतवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी (आरएसएस) दसरा सण विशेष ठरला. कारण, आरएसएसने 90 वर्षांपासून त्यांचे स्वयंसेवक वापरत असलेल्या खाकी हाफ पॅन्टच्या गणवेशात बदल करत त्यांचे परिवर्तन फुल पॅन्टमध्ये केले. या नव्या गणवेशाचा शुभारंभ विजयादशमी मुहूर्तावर करण्यात आला होता.
खाण्या-कपड्यांवरुन नाही तर इतरांना आहे तसे स्वीकारणं म्हणजे हिंदुत्व - मोहन भागवत हिंदुत्व म्हणजे कोण काय खात आहे किंवा काय परिधान करत आहे हे ठरवणं म्हणजे हिंदुत्व नाही तर, इतरांना ते जसे आहेत तसे त्यांचा स्वीकार करणं म्हणजे हिंदुत्व, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपुर्वी केले होते. यावेळी मोहन भागवत असेही म्हणाले होते की, त्यांची संघटना इंटरनेवरील आक्रमक व्यवहार आणि ट्रोलिंगचंही समर्थन करत नाही. 'आरएसएस भाजपाला चालवत नाही आणि भाजपाही आरएसएस चालवत नाही. दोघंही एकमेकांसोबत संवाद साधून चर्चा करतात', असंही त्यांनी सांगितलं.