- अपलोडला झाला उशीर, अधिकारीच दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप
- लोकमत एक्सक्लुझिव्ह
वसीम कुरैशी / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या वर्षी लागू झालेल्या टाळेबंदीपासून ते आता सुरू असलेल्या टाळेबंदीपर्यंत प्रथमच मनपाने ग्राहकांमध्ये व्यक्तिश: अंतर न राखल्याच्या कारणावरून शासकीय धान्य वितरण अर्थात रेशनच्या दुकानावर दंड ठोठावला आहे. हे दुकान सदर झोनअंतर्गत येते. मात्र, यात विभागाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार या महिन्यात रेशन दुकानांमध्ये सुरुवातीपासूनच धान्य होते; परंतु वेळेत वितरण झालेले नाही. धान्य वितरणासाठी दुकानदारांनी मशीनवर डेटा अपलोड केला नव्हता. ही अपलोडिंग १५ मार्चला करण्यात आली. १५ मार्चपासूनच टाळेबंदीला सुरुवात झाली. या काळात दुपारी १ वाजेपर्यंतच दुकाने उघडण्याची परवानगी होती. त्यामुळे, रेशन दुकानांसमोर मोठ्या प्रमाणात ग्राहकांची वर्दळ दिसून येत होती. टाळेबंदी आणि महागाईमुळे नागरिकांच्या उत्पन्नावर प्रचंड प्रहार पडला आहे. त्यामुळेच, ज्यांनी कधी रेशनच्या दुकानाची पायरी चढली नव्हती, ते सुद्धा आता धान्य घेण्यासाठी रेशनच्या दुकानात येत आहेत. त्यामुळे गर्दी प्रचंड वाढत आहे. अशा स्थितीत एका रेशन दुकानावर दंड ठोठावण्यासोबतच चार दुकानदारांना मनपाच्या पथकाने नोटिसा जारी केल्या आहेत.
--------------
बॉक्स..
नागरिकांच्या सुविधेवरही लक्ष असावे
मर्यादित वेळेपर्यंतच दुकान सुरू असणार असल्याने अनेक महिलांना धान्य घेण्यासाठी रेशन दुकानापर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. शिवाय, पोलिसी कारवाईच्या भीतीनेही अनेक लोक दुचाकीवर डबल सीट येऊ शकत नसल्याने, दुकानापर्यंत पोहोचत नाहीत. रेशन दुकानांपर्यंत येणाऱ्यांसाठी प्रशासनाकडून स्पष्ट निर्देश असायला हवेत.
- सुभाष मुसळे, रेशन दुकानदार
-----
धान्य वितरण अधिकाऱ्यांनी घ्यावा निर्णय
आपत्कालीन काळात मशीनमध्ये डेटा अपलोड होत नाही. सर्व्हर ठप्प पडते. अशा स्थितीत धान्य वितरण अधिकाऱ्यांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे. रेशन दुकानांमध्ये सुरुवातीपासूनच धान्य उपलब्ध होते; परंतु १५ मार्च रोजी डेटा अपलोड करण्यात आला. वितरणास झालेला उशीर आणि मर्यादित वेळेत दुकाने सुरू असल्याने ग्राहकांची संख्या वाढण्याची शक्यता होती; परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि सदर झोनने एका दुकानदारावर पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. धान्याचे वितरण शासकीय दुकानातून केले जात आहे. अशा स्थितीत विभागाने रेशन दुकानांतून होणारे वितरण व वेळेबाबत स्पष्ट असे लिखित निर्देश देणे अपेक्षित आहे.
- गुड्डू अग्रवाल, अध्यक्ष : रेशन दुकान संघ
------------
बॉक्स...
माहिती देण्यास नकार
रेशन दुकानदारांच्या या समस्येबाबत रविवारी संध्याकाळी जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सध्या माहिती देण्याची इच्छा नसल्याचे सांगितले आणि दुसऱ्या दिवशी याबाबत चर्चा करू, असे सांगितले.
...