सुधार गृहातील इतरांना प्रेरणा : सुधार गृहाच्या प्रयत्नांना यश लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पीडित मुलींच्या शासकीय करुणा महिला वसतिगृहातील दोन मुली शालांत परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. नागपूर शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध सेलने या मुलींची अनैतिक व्यापारातून सुटका केली होती. त्यानंतर बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार त्यांना या वसतिगृहात पुनर्वसनाची संधी देण्यात आली होती. अनैतिक व्यापारातून सुटका झाल्यानंतर मानसिक तणाव व शारीरिक व्याधीतून त्यांना बाहेर काढून सर्वसामान्य जीवन स्वीकारण्यासाठी सेव्ह द चिल्ड्रेन इंडियातर्फे करण्यात आलेल्या प्रयत्नामुळेच पहिल्यांदाच या मुली शालांत परीक्षेला बसू शकल्या. यासाठी महिला वसतिगृहाच्या अधीक्षक भारती मानकर यांच्या प्रयत्नामुळे दोन्ही मुली दहावीची परीक्षा देऊ शकल्या. यात त्यांना यश मिळाले. यापूर्वी बारावीच्या परीक्षेतसुद्धा पुनर्वसन सुधार गृहातील एक मुलगी उत्तीर्ण झाली. या विभागात अशा स्वरूपाचा उपक्रम प्रथमच राबविण्यात आला आहे. बाल सुधार गृहातील सुविधांमुळे दहावीची परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी त्यांना मिळाली. या मुलींची शिक्षक व परिचारिका होण्याची इच्छा आहे. यासाठी यापुढेही शिक्षण सुरू ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. बारावीत पास झालेली मुलगीसुद्धा नर्सिंगच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेणार आहे. अनैतिक मानवी व्यापारात सापडलेल्या मुलीची सुटका केल्यानंतर त्यांना परत शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन प्रवेशासाठी विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल जाधव यांनी पुढाकार घेतला. अशा मुलींना शाळेत उपस्थित राहता येत नसल्यामुळे बाल सुधार गृहातच त्यांच्या शिकवणीची व्यवस्था सेव्ह द चिल्ड्रेन या संस्थेने केली होती. बाल सुधार गृहातील मुली पहिल्यांदाच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे इतर मुलींना शिक्षणासाठी प्रेरणा मिळणार आहे.
पहिल्यांदाच बाल सुधार गृहातील दोन मुली उत्तीर्ण
By admin | Published: June 14, 2017 1:16 AM