लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगातील सनातन व श्रेष्ठ सिंधू संस्कृतीची सभ्यता व ऐतिहासिक महत्त्वाची जाणीव युवा पिढीला व्हावी, तसेच सिंधी लोककला जिवंत राहावी, या हेतूने महापालिका व भारतीय सिंधू सभा, नागपूर यांच्यावतीने पारंपरिक वेशभूषेत जगात प्रसिद्ध असलेल्या सिंधी छेज नृत्य स्पर्धेचे भव्य आयोजन १० फेब्रुवारीला मानकापूर येथील इन्डोअर स्टेडियम येथे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महापौर नंदा जिचकार यांच्या उपस्थितीत छेज नृत्य स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येईल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषदेचे उपाध्यक्ष घनश्याम कुकरेजा, किशोर लाववानी, राजेश कृपलानी यांच्यासह भारतीय सिंधू सभेचे पदाधिकारी उपस्थित होते.सिंधी छेज नृत्य जगात प्रसिद्ध आहे. ही पारंपरिक कला जोपासली जावी, नवीन पिढीला याची जाणीव व्हावी, या हेतूने प्रथमच अशा स्वरूपाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत देशभरातील २० चमूंनी नोंदणी केली आहे. यात मुंबई येथील पाच, नागपूर पाच, अहमदाबाद दोन, बडोदा, जळगाव, आकोट, अमरावती, इंदूर, भिलवाडा आदी शहातील प्रत्येकी एक चमू सहभागी होत आहे. पुरुष व महिलांच्या वेगवेगळ्या चमू राहणार आहेत. प्रथम विजेत्या चमूला ५१ हजारांचे तर उपविजेत्या चमूंना २१ हजारांचे बक्षीस देण्यात येईल.प्रत्येक चमूत १० ते १२ कलावंतांचा समावेश राहणार असल्याची माहिती कुकरेजा यांनी दिली. देशात प्रथमच अशाप्रकारची भव्य प्रमाणात छेज नृत्य स्पर्धा होत आहे.यासोबतच समूह चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. यातून विचाराचे आदानप्रदान होणार आहे.
मित्रा रोबोटचे आकर्षणअखिल भारतीय सिंधी छेज नृत्य स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रात प्रथमच मित्रा रोबोट येणार आहे. विचारलेल्या प्रश्नांना हा रोबोट उत्तरे देणार असल्याने नृत्य स्पर्धेचे आकर्षण राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.