लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका ठकबाजाने शंकरनगर येथील दास ज्वेलर्सला १.०६ कोटीचा चुना लावला आहे. संबंधित आरोपीने तेथून अगोदर दागिन्यांची खरेदी करत विश्वास संपादन केला व त्यानंतर मोठ्या प्रमाणावर दागिने उधारीवर घेत गंडा घातला. अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, आरोपीने अनेकांना अशा पद्धतीने फसविले आहे.
अविश अशोक वस्तानी (३६, रा. शिवाजीनगर) असे तक्रारदाराचे नाव आहे. त्यांचे शंकरनगर येथे दास ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. त्यांचे काका चंद्रकांत वस्तानी, चुलत भाऊ चेतन वस्तानी व ओजस वस्तानी हे त्यांचे भागीदार आहेत. आरोपी राहुलकुमार नरेशचंद्र खाबिया उर्फ जैन (प्लॉट क्रमांक ६७, नलावडे ले आऊट, पडोळे हॉस्पिटलजवळ) हा आरोपी १३ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांच्या दुकानात आला व त्याने ६.८० लाखांचे सोने घेतले आणि रोखीने पैसे दिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो दुकानात गेला व तेथून ७.८५ लाखांचे दागिने घेतले. त्याने ५.०७ लाख रुपये दिले व उर्वरित पैसे काही दिवसांत देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२४ या दोन महिन्यांत तो २० वेळा दुकानात गेला. प्रत्येकवेळी त्याने सोने खरेदी केले व त्याने ऑनलाइन पैसे दिले किंवा पोस्टडेटेड धनादेश दिला. त्यामुळे वस्तानी यांचा त्याच्यावर विश्वास बसला. उधारीवर त्याने १.०७ कोटींचे सोने खरेदी केले व लवकरच पैसे देईल असे तो प्रत्येकवेळी म्हणायचा. दुकानात आल्यावर पैशांचा विषय काढला की तो दुसऱ्या कुठल्यातरी विषयावर बोलायला लागायचा. त्याने दुकानात दोन पोस्टडेटेड धनादेश दिले होते. २६ डिसेंबर रोजी तो एका पोलिस मित्रासह दुकानात गेला व ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे खरेदी करत तेथेच पैसे दिले. त्याने २.४४ लाखांचा धनादेश दिला. मात्र, चंद्रकांत वस्तानी यांनी तो बँकेत टाकला असता तो वटलाच नाही. त्यांनी आरोपीला फोन केला असता त्याने जानेवारीपर्यंत धनादेश बँकेत टाकू नका, अन्यथा रुपयाही देणार नाही, अशी धमकी दिली. फेब्रुवारीत वस्तानी यांनी एक कोटीचा धनादेश बँकेत टाकला असता तोदेखील वटला नाही. आरोपी खाबियाला विचारणा केली असता माझ्या मागे लागले तर एकही रुपया देणार नाही, जे करायचे आहे ते करा, या शब्दांत अरेरावी केली.
'लोकमत'मुळे उघडकीस आली बनवाबनवीयाच आरोपी खाबियाने राणाप्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सप्तशृंगी ज्वेलर्सला २.३४ कोटींचा अशाच पद्धतीने गंडा घातला होता. 'लोकमत'ने हे वृत्त प्रकाशित केले होते. ते वस्तानी यांच्या वाचनात आले व खाबियाची पोलखोल झाली. त्यानंतर वस्तानी यांनी अंबाझरी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपी खाबियाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.