पहिले तुम्ही तुमचे वाद मिटवा, आम्ही गेलो असतो तर अजून बिघाड झाला असता; प्रकाश आंबेडकरांची मविआवर टीका

By कमलेश वानखेडे | Published: March 31, 2024 03:35 PM2024-03-31T15:35:46+5:302024-03-31T16:52:38+5:30

काँग्रेसला सात जागांवर समर्थन पण अकोल्यासाठी समर्थन मागणार नाही, एमआयएम सोबत जाणार नाही - प्रकाश आंबेडकर

First you settle your disputes, if we had gone there would have been more trouble; Prakash Ambedkar's criticism of Maviya | पहिले तुम्ही तुमचे वाद मिटवा, आम्ही गेलो असतो तर अजून बिघाड झाला असता; प्रकाश आंबेडकरांची मविआवर टीका

पहिले तुम्ही तुमचे वाद मिटवा, आम्ही गेलो असतो तर अजून बिघाड झाला असता; प्रकाश आंबेडकरांची मविआवर टीका

नागपूर : वंचित बहुजन आघाडी सात जागांवर काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार आहे. मात्र, त्या बदल्यात अकोल्यासाठी काँग्रेसला समर्थन मागणार नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. अकोल्यात तीन वेळा मला पाडण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुस्लिम उमेदवार दिला. आज तेथे मुस्लिम उमेदवार दिला तरी आम्ही तुमच्या सोबत येणार नाही, अशी भूमिका मुस्लिम बांधवांनी घेतली आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे, असा दावाही त्यांनी केला.

ॲड. आंबेडकर रविवारी नागपुरात पूर्व विदर्भातील संजय केवट (भंडारा-गोंदिया), राजेश बेले (चंद्रपूर), शंकर चहांदे (रामटेक) व रितेश मडावी (गडचिरोली) या चार उमेदवारांसह पत्रकार परिषद घेतली. ॲड. आंबेडकर म्हणाले, वंचितने पाठिंब्या दिल्यावर काँग्रेस जिंकू शकते, अशा सात जागांवर समर्थन देण्याचे पत्र वंचितकडून काँग्रेसला देण्यात आले होते. काँग्रेसने त्यानुसार पत्र देत नागपूर व कोल्हापूर या दोन जागांसाठी समर्थन मागितले, म्हणून आपण या दोन जागांवर पठिंबा जाहीर केला. उर्वरित ५ जागांवर समर्थन मागण्याचे पत्र काँग्रेसने दिले तर समर्थन जाहीर केले जाईल. काँग्रेस राष्ट्रवादी गेल्यावेळी हरलेल्या १२ जागांपैकी आम्ही जागा मागितल्या होत्या. पण ते द्यायला तयार नाही. गेल्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे आमच्या आठ जागा पडल्या होत्या. आम्हाला त्या आठ जागेवर हिंदू मते मिळाली मात्र मुस्लिम मते काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ब्लॉक केली. ते मतदार आम्हाला मिळाले असते तर आम्ही जिंकलो असतो, असा दावा त्यांनी केला. महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात आम्ही निवडणूक लढवणार आहोत. मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आम्हाला त्याचा फरक पडत नाही. एमआयएम सोबत न जाण्याचा पक्षाचा निर्णय होता. तोच मी कळविला आहे, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीत एकमत नाही
-महाविकास आघाडीत एकमत होताना दिसत नाही. यादी जाहीर होत नाही पण उमेदवार जाहीर होत आहेत. फ्रेंडली फाईट अशी संकल्पना मांडत आहेत. या तिन्ही पक्षात फाईट होणार होती हे आम्हाला अगोदरच माहीत होते. त्यामुळेच आम्ही त्यांना पहिले तुम्ही तुमचे वाद मिटवा, असे सांगितले. आम्ही सोबत जाऊन अजून बिघाड झाला असता, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

भाजपला एवढ्या लोकांना घेण्याची गरज काय ?
भाजपला एवढ्या मोठ्या प्रमाणात दुसऱ्या लोकांना घेण्याची गरज काय, त्यांची सुद्धा तीच परिस्थिती आहे. ज्या मतदारसंघात भाजप लढली आहे तिथे त्यांचे प्राबल्य आहे, मात्र जिथे भाजप लढलेले नाही तिथे त्यांचे प्राबल्य नाही. ते प्राबल्य आपल्याला मिळावे म्हणून काही पक्ष फोडण्यात आले. त्यामुळे भाजप मनसेला सुद्धा स्वतःच्या पक्षांमध्ये सोबत घेण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.

ईव्हीएमवर ८०० हून अधिक मतांचा डेमो करा
ईव्हीएमवर मॉक पोल होईल तेव्हा अधिकाऱ्याने आणलेल्या मशीनवर करू नका. स्ट्राँगरूम मधून स्वत: ईव्हीएम निवडा. केवळ ५० मतांचा डेमो करू नका, तर किमान ८०० ते १२०० मते ईव्हीएमवर टाकून पहा, असा सल्ला ॲड. आंबेडकर यांनी उमेदवारांना दिला. मतदानानंतर चिन्ह व्हीव्हीपॅटवर उमटले की नाही, याचीही खातरजमा करा. ईव्हीएम सील करणारे ट्रक किती आले व किती वापरले याचा हिशोब आयोगाकडे मागा, असा सल्लाही त्यांनी दिला.

Web Title: First you settle your disputes, if we had gone there would have been more trouble; Prakash Ambedkar's criticism of Maviya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.