प्रवीण खापरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजघडीला एक रुपया गुंतवणुकीतून दोन रुपये शुद्ध नफा देईल, असा कोणताच व्यवसाय नाही. देशात बेरोजगारीचा प्रश्न कायमचाच आहे आणि शेतकऱ्यांची अवस्था सगळ्यांना अवगत आहे. त्यात कोरोना संसर्गाने भारताचीच नव्हे तर जगाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे शेतकरी असो वा कामगारवर्ग सगळेच दैनावस्थेत आले आहेत. अशास्थितीत शेतकऱ्यांसाठी व ज्यांच्याजवळ हक्काची जमीन आहे, अशांसाठी मत्स्योत्पादन संजीवनी ठरणार आहे. एक रुपयाचे दोन रुपये शुद्ध नफा देणारा हा व्यवसाय आहे. नियोजनबद्धता असल्यास, या व्यवसायातून कास्तकार व बेरोजगारांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
जगाची वाढती लोकसंख्या आणि या लोकसंख्येची भूक भागविण्यासाठी कारगर उपाययोजनांच्या अनुषंगाने झालेल्या एका खासगी सर्वेक्षणातून मत्स्योत्पादन हा अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय ठरणार असल्याचे भाकीत पुढे आले आहे. भारतातील बहुसंख्य समाज हा शाकाहारी असला तरी मांसाहाराकडे वळणाºयांची संख्या मोठी आहे. भविष्यात जनसंख्या स्फोटाच्या काळात जमीन अन् पालेभाज्यांच्या उत्पादनाचे परिमाण विचारात घेता भूक भागविण्याकरिता मांसाहार हा सर्वात मोठा पर्याय असणार, हे निश्चित. त्याच कारणाने भविष्यात मत्स्योत्पादन हा सर्वसामान्यांना रोजगार देण्यासोबतच अर्थव्यवस्थेचा कणा होणारा व्यवसाय ठरण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या हा व्यवसाय अत्यंत संकुचित असल्याचे दिसून येते आणि त्याचा परिणाम म्हणून मागणीला पुरवठा कमी आहे.
एकट्या विदर्भाचा विचार केला तर एका वर्षाला चार लाख हजार मेट्रिक टन इतक्या मत्स्योत्पादनाची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी आज ६० कोटी मत्स्यबीजा(सीड्स)ची गरज आहे. मात्र, मत्स्यबीजाअभावी वर्तमानात विदर्भातून केवळ १ लाख २५ हजार मेट्रिक टन मत्स्योत्पादनच होत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी कोकण, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातून मासोळ्यांची आयात केली जाते. त्यातून विदर्भातूनही निर्यात होत असलेल्या मासोळ्यांचीच तूट भरून काढली जाते. हा सगळा विचार करता, बहुसंख्यक बेरोजगार व कास्तकारांना आत्मनिर्भर होण्यासाठी हा व्यवसाय टर्निंग पॉर्इंट ठरणार आहे.जोडधंदाच नव्हे तर प्रमुख व्यवसाय म्हणून मोठी संधी - प्रभाकर मांढरे: विदर्भात ४२ हजार तलाव आहेत आणि त्यातील बहुतांश तलावामध्ये पारंपरिकरीत्या मत्स्योत्पादन केले जाते. यात नियोजनबद्धता आल्यास उत्पादनात आणखी वाढ करता येऊ शकते. महाराष्ट्रात भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर येथे पाण्याची पातळी सर्वोत्तम असल्याने तलावांव्यतिरिक्त मत्स्योत्पादन करणे शक्य आहे. त्या अनुषंगाने विचार केल्यास प्रत्येक शेतकरी कृषीसोबतच एक जोडधंदा म्हणून आपल्याच जमिनीच्या एका तुकड्यात मत्स्योत्पादन करू शकतो. यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या अनुदान योजनाही आहेत. सुरुवातीला सुरू झालेला हाच जोडधंदा नंतर प्रमुख व्यवसायात रूपांतरित होण्याची क्षमता या व्यवसायात असल्याचे विदर्भ मच्छिमार संघटनेचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रभाकर मांढरे यांनी सांगितले.