आॅनलाईन लोकमतनागपूर : विदर्भ मच्छिमार संघाची इमारत जिल्हा प्रशासनाने हेरिटेज वॉकसाठी जमीनदोस्त केली. ही इमारत मच्छिमार संघाला सोपविण्यापूर्वी संघाच्या अध्यक्षाने सहकार कायद्यानुसार सभासद संस्थांना विश्वासात न घेता, आमसभेत ठराव न घेता, धोरणात्मक निर्णय घेतला. मच्छिमार संघाची इमारत अध्यक्षाची खासगी संपत्ती नव्हती. अध्यक्षानी परस्पर निर्णय घेऊन सभासदांसोबत विश्वासघात केला असल्याचा आरोप करीत, इमारतीसाठी २६४ सभासद संस्था एकवटल्या असून, संविधान चौकात अध्यक्ष आणि प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली.माजी खासदार जतीराम बर्वे यांनी मच्छिमार समाजाला उपजीविकेचे साधन निर्माण करण्यासाठी १९४४ ला रामटेक येथे मच्छिमार संस्थेची स्थापना केली. त्यानंतर मच्छिमार संघाचे जाळे विदर्भ, राज्य व देशभर पसरले. संघाच्या स्थापनेनंतर कृषी व सहकार विभागाच्या मत्स्योद्योग महामंडळातर्फे झिरो माईल येथे बर्फ कारखाना व कोल्ड स्टोरेजची स्थापना करण्यात आली. १९८५ ला जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल व वन विभागाच्या सचिवांना ही जागा कृषी विभागाकडून मत्स्य महामंडळ व महामंडळाकडून विदर्भ संघाला हस्तांतरित झाल्याचे पत्र लिहिले. परंतु हेरिटेज वॉकसाठी संघाची २१००० चौरस फूट जागा लागत असल्यामुळे प्रशासनाने संघाला पत्र दिले. त्यावर अध्यक्ष प्रकाश लोणारे यांनी जमीन परत करीत असल्याचे होकार पत्र दिले. परंतु २३ जानेवारी २०१७ सहायक निबंधक सहकारी संस्था यांनी लोणारे यांना संघाच्या प्राथमिक सदस्यातून निष्कासित केले. त्यामुळे ते अध्यक्ष पदावरूनही निष्कासित झाले असल्याचे संघाच्या सभासदांचे म्हणणे आहे. त्यामुळे पदच्युत अध्यक्षाला जागा लिहून देण्याचे कसलेही अधिकार राहत नाही, असे सभासद म्हणाले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी संघाला तीन दिवसात जागा खाली करून देण्याची नोटीस दिली. त्या नोटिसीला १० किरायेदारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यात न्यायालयाने ८५५४ चौ. फूट जागा संघाची असून, उर्वरित अतिक्रमित जागा ४३०० चौ. फूट संघाने खाली करून द्यावी, असे म्हटले आहे. तरी सुद्धा जिल्हा प्रशासनाने संपूर्ण इमारत जमीनदोस्त केली.प्रशासन आणि अध्यक्षाच्या विरोधात २६४ सभासद संस्थांनी लढा पुकारला आहे. त्यासाठी न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. शनिवारी झालेल्या धरणे आंदोलनात संपूर्ण मच्छिमार येत्या १६ जानेवारीला निषेध नोंदविणार आहे. आजच्या धरणे आंदोलनात अशोक बर्वे, चंद्रलाल मेश्राम, बाबूराव बावणे, कृष्णा नागपूरे, देवीदास चवरे, यादवराव पाटील, यशवंत दिघोरे, राजेंद्र गौर, प्रकाश पचारे, प्रभाकर मांढरे, युवराज नागपुरे, गजेंद्र चावरेकर, योगेश दुधपचारे, रमेश गौर, अॅड. राजेश नायक, मुकुंद आडेवार, दीनानाथ वाघमारे उपस्थित होते.
मच्छिमार संघाची मालमत्ता अध्यक्षांची खासगी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 8:10 PM
मच्छिमार संघाची इमारत अध्यक्षाची खासगी संपत्ती नव्हती. अध्यक्षानी परस्पर निर्णय घेऊन सभासदांसोबत विश्वासघात केला असल्याचा आरोप करीत, इमारतीसाठी २६४ सभासद संस्था एकवटल्या असून, संविधान चौकात अध्यक्ष आणि प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली.
ठळक मुद्देसंघाच्या इमारतीसाठी एकवटले २६४ संघइमारतीसाठी संविधान चौकात दिले धरणे