लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : येरला (ता. नागपूर ग्रामीण) येथील झुणका-भाकर केंद्रात जेवणाच्या बिलावरून सात-आठजणांनी दाेघांना बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. १७) रात्री घडली. या प्रकरणात कळमेश्वर पाेलिसांनी आधी दाेन व नंतर तीन अशा एकूण पाच आराेपींना अटक केली. अन्य आराेपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पाेलिसांनी स्पष्ट केले.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये आनंद वर्मा, अभिनेश वर्मा, लाला यादव, साहिल ढोणे व अमन शेवाळे (सर्व रा. येरला, ता. नागपूर ग्रामीण) या पाचजणांचा समावेश आहे. येरला येथील झुणका-भाकर केंद्रात जेवणाचे बिल तयार करण्यावरून वाद उद्भवला आणि गाेलू वर्मा व त्याच्या साथीदारांनी सुरुवातीला सचिन वाढी (रा. येरला) यास मारहाण केली. त्यानंतर या सर्वांनी सचिनला मारहाण का केली? अशी विचारणा करणारा त्याचा मित्र आशिष बदकी यालाही मारहाण केली. आशिष विचारणा करण्यासाठी गाेलूच्या घरी गेला हाेता, यात दाेघेही जखमी झाले हाेते.
दरम्यान, कळमेश्वर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून आनंद वर्मा व अभिनेश वर्मा या दाेघांना गुरुवारी (दि. २१), तर लाला यादव, साहिल ढोणे व अमन शेवाळे या तिघांना नंतर अटक केली. या प्रकरणातील अन्य आराेपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार आसिफराजा शेख यांनी दिली. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक प्रवीण मुंडे करीत आहेत.