नागपूर : दरोडा टाकण्याच्या तयारीतील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाने ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका तडीपार गुंडाचादेखील समावेश आहे.
सोमवारी मध्यरात्री पावणेदोन ते तीन वाजताच्या सुमारास गस्तीवर असताना गुन्हे शाखेच्या पथकाला वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवर्धन नगरीजवळील मोकळ्या जागेत संशयित इसम असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे धाड टाकली असता पाच आरोपी दिसून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे लोखंडी तलवार, दोन चाकू, स्टीलचा रॉड, मिरची पावडर, दोरी असे साहित्य आढळले.
पोलिसांनी साईबाबा नगर, खरबी येथील मयुर गजाजन जाधव (२५), रोहीत महादेव गिरी (२२), ऋतिक विजय शेंदरे (२१), गौरव शेखर उरकुडे (२०, श्रावण नगर, वाठोडा) व नूर मोहम्मद फिरोज खान (१९, शिवणकर नगर झोपडपट्टी) यांना अटक केली. त्यांच्याकडून २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीअंती गौरव उरकुडे याला वर्षभरासाठी तडीपार केल्याची बाब समोर आली.
तडीपार असतानादेखील तो नागपूर शहराच्या हद्दीत येऊन गुन्हेगारी कारवाया करत होता. पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनटक्के, अविनाश जायभाये, सुनिल ठवकर, दीपक चोले, देवेंद्र नवघरे, अतुल चाटे, चेतन पाटील, स्वप्नील अमृतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.