लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने शुक्रवारी सिंचन घोटाळ्यातील पाच आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला. हा घोटाळा गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेंतर्गतच्या नक्षी शाखा कालवा, त्यावरील चार वितरिकेचे मातीकाम, बांधकाम व अस्तरीकरणाशी संबंधित आहे.जामीन मिळालेल्या आरोपींमध्ये अंभोरा उपसा सिंचन विभाग भिवापूरचे तत्कालीन सचिव व कार्यकारी अधिकारी उमाशंकर वासुदेव पर्वते, तत्कालीन लेखा अधिकारी चंदन तुळशीराम जिभकाटे, भंडारा जिल्ह्यातील आंबाडी येथील गोसेखुर्द उपसा सिंचन मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता दिलीप देवराव पोहेकर, गोसेखुर्द प्रकल्पाचे तत्कालीन मुख्य अभियंता सोपान रामराव सूर्यवंशी व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे तत्कालीन कार्यकारी संचालक देवेंद्र परशुराम शिर्के यांचा समावेश आहे. या कामाचे कंत्राट हैदराबाद येथील के. के. रेड्डी अॅन्ड कंपनीला ५८ कोटी ७१ लाख ४३ हजार रुपयात देण्यात आले होते. या कंत्राट वाटपात नंदकुमार वडनेरे कमिटीने अनेक आक्षेप घेतले आहेत. या कंत्राटामुळे सरकारचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तसेच, विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल झाले आहे. आरोपींतर्फे अॅड. चंद्रशेखर जलतारे व अॅड. प्रकाश रणदिवे यांनी बाजू मांडली.