लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने मंगळवारी नागपूर जेल ब्रेक प्रकरणातील पाच आरोपींना प्रत्येकी दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली तर, दोन आरोपींना ठोस पुराव्यांअभावी निर्दोष सोडले. मोक्काचे गुन्हे मात्र सातही आरोपींविरुद्ध सिद्ध होऊ शकले नाहीत. ही घटना संपूर्ण राज्यात गाजली होती.बिसेनसिंग रामुलाल उईके (वय ३५, रा. मध्य प्रदेश), मो. शोएब ऊर्फ शेख मुस्तफा सलीम खान (वय २४, रा. न्यू मानकापूर), सत्येंद्र ऊर्फ राहुल रायबहादूर गुप्ता (वय २४, रा. कामठी), प्रेम ऊर्फ नेपाली शालिकराम खत्री (वय २१, रा. नेपाल) व आकाश ऊर्फ गोलू रज्जूसिंग ठाकूर (वय २२, रा. पिली नदी) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना भादंविच्या कलम २२४ (कायदेशीर अटकेला विरोध) व कलम १२०-ब (कट रचणे) अंतर्गत प्रत्येकी दोन वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. या आरोपींना मदत केल्याचा आरोप असणारे गणेश शर्मा व नवाब तौहीद खान हे निर्दोष सुटले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी हा निर्णय दिला.ही घटना ३१ मार्च २०१५ रोजी मध्यरात्रीनंतर २ च्या सुमारास घडली होती. शिक्षा झालेले आरोपी कारागृहातील खिडकीची लोखंडी ग्रील कापून बाहेर पडले व त्यानंतर २३ फूट उंच सीमा भिंत पार करून पळून गेले. सीमा भिंत चढण्यासाठी त्यांनी चादरी व शाली एकमेकांना बांधल्या होत्या. आरोपी फरार झाल्याचे दुसऱ्या दिवशी सकाळी माहिती पडले होते. आरोपींतर्फे अॅड. आर. एच. रावलानी, अॅड. ए. आर. रावलानी, अॅड. मंगेश मून, अॅड. अनुभव मार्डीकर, अॅड. अवधेश केसरी तर, सरकारतर्फे अॅड. विजय कोल्हे यांनी कामकाज पाहिले.आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी अटकया घटनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारागृह अधीक्षक वैभव कांबळे यांना तात्काळ निलंबित केले होते. त्यानंतर तपासाची चक्रे वेगात फिरवून आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आली. धंतोलीचे सहायक पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांनी जेल ब्रेक तर, अजनी झोनचे सहायक पोलीस आयुक्त बाबाजी बुधवंत यांनी मोक्काचा तपास केला.
नागपूर जेल ब्रेकमधील पाच आरोपींना प्रत्येकी दोन वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 9:18 PM
सत्र न्यायालयाने मंगळवारी नागपूर जेल ब्रेक प्रकरणातील पाच आरोपींना प्रत्येकी दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली तर, दोन आरोपींना ठोस पुराव्यांअभावी निर्दोष सोडले.
ठळक मुद्देसत्र न्यायालयाचा निर्णय : दोन आरोपींची निर्दोष सुटका