न्यायालय : पांढराबोडी येथे घडली होती घटनानागपूर : अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढराबोडी येथे एका तरुणास पेट्रोलने जिवंत जाळून खून करणाऱ्या पाच आरोपींची अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली. राजेश कल्लू मोगरे, असे मृताचे नाव होते. तो पांढराबोडी येथील रहिवासी होता. गुड्डू राजेश कासेकर (२५), लोटन सुदर्शन सकतेल (५५), राजेश ईश्वर कासेकर (४४), अनिल बंसीलाल चव्हाण (३५) आणि लीलाबाई लोटन सकतेल (५०) सर्व रा. पांढराबोडी, अशी आरोपींची नावे आहेत. खुनाची ही घटना ४ डिसेंबर २०१२ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली होती. सरकार पक्षानुसार मृत राजेश मोगरे आणि आरोपी हे एकमेकांच्या शेजारी राहायचे. त्यांची नेहमीच आपसात भांडणे व्हायची. घटनेच्या दिवशी मोगरे याचे लोटन सकतेल याच्यासोबत भांडण झाले असता लीलाबाईने चिथावणी दिली. लोटन याने त्याच्या अंगावर पेट्रोल ओतले होते. राजेश कासेकर आणि अनिल चव्हाण यांनी त्याला पकडून ठेवले होते. त्यानंतर गुड्डू कासेकर याने आगकाडीने त्याला पेटवून दिले होते. मोगरे हा ८९ टक्के जळाला होता. अनिल चव्हाणचे हातही जळाले होते. शेजाऱ्यांनी आग विझवून मोगरे याला उपचारार्थ मेयो इस्पितळात नेले असता दुसऱ्या दिवशी ५ डिसेंबर २०१२ रोजी त्याला मृत्यू झाला होता. त्याचे मृत्यूपूर्व बयाण नोंदवण्यात आले होते. मृताची आई सुधा मोगरे हिच्या तक्रारीवर अंबाझरी पोलिसांनी भादंविच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक केली होती. न्यायालयात १० साक्षीदार तपासण्यात आले. बचाव पक्षाच्या वकिलांनी आपल्या युक्तिवादात सांगितले की, तपासात बऱ्याच त्रुटी आहेत. मृत्यूपूर्व बयाण आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षीत तफावती आहेत. प्रत्यक्ष घटना कोणत्या ठिकाणी घडली, याबाबतही संशय आहे. एक आरोपी अनिल चव्हाण याच्या हातावरील जखमांचे व्रण जळाल्याचे नसून त्या जखमा अन्य बाबीने झालेल्या आहेत. न्यायालयाने बचाव पक्षाचे म्हणणे ग्राह्य धरून सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली. न्यायालयात आरोपींच्या वतीने अॅड. आर. के. तिवारी, अॅड. पराग उके, अॅड. काझी, अॅड. चेतन ठाकूर तर सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील सुनीता खोब्रागडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
तरुणास पेट्रोलने जिवंत जाळणारे पाच आरोपी निर्दोष
By admin | Published: February 10, 2016 3:31 AM