लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : दराेडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच अट्टल चाेरट्यांना कामठी (नवीन) पाेलिसांनी शिताफीने ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून शस्त्र व दुचाकी वाहने असा एकूण ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई घाेरपड-पावनगाव मार्गावर बुधवारी (दि. ६) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये शाहीद ऊर्फ पप्पू ऊर्फ काल्या जलालुद्दीन अन्सारी (वय २८), शेख समीर ऊर्फ बॉम्बट्या रहीम (१९) दाेघेही रा. चित्तरंजन झोपडपट्टी, कामठी, आकाश ऊर्फ चाटी अहमद फैयाज अहमद (२४, रा. वीणकर काॅलनी, कामठी), शेख सलीम ऊर्फ सलीम लंगड्या सलोक (३५) व शेख जाफर (३५, दाेघेही रा. मच्छीपूल, कामठी) या पाचजणांचा समावेश असून, एकजण पळून गेल्याने पाेलीस त्याचा शाेध घेत आहेत.
कामठी (नवीन) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना कामठी तालुक्यातील घाेरपड-पावनगाव मार्गावर काहीजण संशयास्पद स्थितीत फिरत असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी या शिवाराची पाहणी केली. त्यांना या राेडलगतच्या कालव्याच्या बाजूला (एमएच-२७/एजे-५६६८ व सीजी-०४/डीई-६९०८) दाेन माेटारसायकली आढळून आल्या. त्याच परिसरात पाचही आराेपी फिरत असल्याचे लक्षात येताच पाेलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.
चाैकशीअंती त्यांच्याकडे शस्त्र आढळून आल्याने, तसेच ते कुठेतरी दराेडा टाकण्याच्या तयारी असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याकडून दाेन माेटारसायकली, भाला, तलवार, चाकू, मिरची पावडर, नाॅयलाॅन दाेरी, आदी साहित्य जप्त केले असून, त्या साहित्याची एकूण किंमत ५५ हजार रुपये असल्याची माहिती ठाणेदार संजय मेंढे यांनी दिली. त्यांच्याकडून इतर गुन्हे उघड हाेण्याची शक्यता संजय मेंढे यांनी व्यक्त केली असून, फरार आराेपीस लवकरच अटक करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, उपनिरीक्षक विनायक आसतकर यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.